डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा रात्री आठ ते पहाटे पाच वाजेपर्यंत अति रासायनिक प्रदूषण सुरू असल्याने रहिवासी विविध व्याधींनी त्रस्त झाले आहेत. या प्रदूषणाचा वृद्ध, दम्याचे रूग्ण यांना सर्वाधिक त्रास होत आहे. या प्रदूषणामुळे सर्दी, खोकला, डोळ्यांची आग असा त्रास होत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. या प्रदूषणाविषयी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणतीही आक्रमक भूमिका घेत नसल्याने रहिवासी खूप संताप व्यक्त करीत आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळ जनतेने आवाज उठविला की तेवढय़ापुरते एखाद्या कंपनीवर कारवाई करते.  काही दिवसांनी गुपचूप त्या कंपनीवरील बंदी उठवून राजरोस त्या कंपनीला उत्पादन करण्याची परवानगी देते, असे येथील रहिवाशांनी सांगितले.
दोन दिवसापूर्वीच बंदी टाकलेल्या एका कंपनीने आपली कंपनी पुन्हा सुरू झाली म्हणून धूमधडाक्यात धार्मिक कार्यक्रम करून परिसरातील जनतेला जेवणावळ घातली, असे येथील रहिवाशांनी सांगितले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, मानपाडा पोलीस, आमदार, खासदार यांचे स्थानिक प्रशासनावर कोणतेही नियंत्रण नसल्याने अधिकारी बेफिकीर आहेत, अशी टीका येथील नागरिकांकडून केली जात आहे. आता दिवाळीचे फटाके, त्यात रासायनिक प्रदूषण त्यामुळे जगणे मुश्कील होईल असे येथील रहिवाशांनी उद्विग्नपणे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा