डोंबिवली परिसरातील ४० ग्रामपंचायतींनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची पाणी देयकाची १५ कोटी ६८ लाख रुपयांची रक्कम थकवली आहे. येत्या दहा दिवसांत ग्रामपंचायतींनी थकीत रक्कम भरणा केली नाही तर संबंधित गावांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे, असे एमआयडीसीचे डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर जगताप यांनी सागितले.
ग्रामपंचायत हद्दीत केवळ गावे राहिली नाहीत त्यांच्या बाजूला, गावात मोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत. या संकुलांना ग्रामपंचायतींकडून पाणीपुरवठा केला जातो. ग्रामपंचायती या गृहसंकुलांमधून लाखो रुपयांची घरपट्टी वसूल करतात, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
सोनारपाडा, वसार, नांदिवली, भोपर, काटई, मानपाडा या ग्रामपंचायतींची पाणी देयकांची थकबाकी १ कोटी रुपयांहून अधिक आहे. उसरघर पंचायतीने पाणी देयक भरणा केले आहे. उर्वरित ३९ पंचायतींना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. येत्या दहा दिवसांत ग्रामपंचायतींनी पाणी देयक रक्कम भरणा केली तर त्या वरील दंड रक्कम माफ करण्यात येईल, असे जगताप यांनी सांगितले.
आमदार सुभाष भोईर यांनी ग्रामीण भागातील पाणीटंचाईबाबत काल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या पाश्र्वभूमीवर ते या थकीत रकमेबाबत कोणती भूमिका घेतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे. येत्या नऊ महिन्यांत ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. त्या वेळी या थकीत रकमेविषयी जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते याकडे एमआयडीसीचे लक्ष लागले आहे.

Story img Loader