प्रस्तावित मिहान व भविष्यात नागपूरच्या आजूबाजूला होऊ शकणारा औद्योगिक विकास डोळयासमोर ठेवून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) नवे आलिशान सभागृह बांधण्याचे ठरवले असले तरी या प्रकल्पासाठी अपेक्षित इच्छुक विकासक पुढे न आल्याने एमआयडीसीला दुसऱ्यांदा निविदा काढावी लागली. बुटीबोरी येथे होऊ  घातलेल्या या सभागृहाच्या बांधकामासाठी मूळ अटी व शर्तीमध्ये काही बदल करून आता महामंडळाच्या वतीने नव्याने निविदा काढण्यात आली आहे.
मिहान तसेच इतर औद्योगिक क्षेत्रातील वाढते उद्योग आणि कार्यक्रम लक्षात घेता  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बुटीबोरी येथे प्रदर्शने तसेच कार्यक्रमांसाठी उपयुक्त असे सभागृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास २० एकर जागेत हे सभागृह बांधावयाचे असून व्यावसायिक तसेच औद्योगिक  क्षेत्राशी संबंधित बैठका, संमेलने, प्रदर्शने इत्यादीकरिता उपयोगात येणार आहे. प्रदर्शनांसाठी जागा व सभागृह, कार्यक्रमाचे सभागृह, बैठकांसाठी कक्ष, कार्यालयांची जागा, कमीतकमी चार तारांकित व ७५ खोल्यांचे हॉटेल, रेस्टॉरेंट याशिवाय संपूर्ण परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करणे यासारख्या विविध कामांचा समावेश या प्रकल्पात आहे. नागपूर व्यतिरिक्त भोपाळ, रायपूर व इंदोर येथील ग्राहकांचा देखील या प्रस्तावित सभागृहास प्रतिसाद मिळण्याची शक्यता गृहित धरण्यात आली आहे. जागेव्यतिरिक्त सुमारे २५० कोटींचा हा प्रकल्प असून ४० वर्षांकरिता विकासकाच्या अखत्यारित राहणार आहे. बांधा, वापरा व हस्तांतरित करा, या तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येईल व विकासकाला तीन वर्षांत या प्रकल्पाचे काम पूर्ण करावयाचे आहे.
या कामासाठी लागणारी पर्यावरण संबंधी मंजुरी एमआयडीसी मिळवून देणार आहे. केवळ व्यावसायिक तसेच औद्योगिक कार्यक्रमांसाठी नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या सुविधा निर्माण करण्यात येतील. कोणत्याही परिस्थितीत इतर नागरी कामांसाठी हे सभागृह देण्यात येणार नाही. नोएडा, गुडगाव किंवा इतर काही ठिकाणे सोडल्यास अशा सुविधा अत्यंत कमी ठिकाणी असल्याचे एमआयडीसीचे सहायक अभियंता संजय बेदरकर यांनी सांगितले.  या संबंधीची पहिली निविदा महामंडळाच्या नागपूर येथील अधीक्षक अभियंत्यांच्या नावाने ऑगस्ट महिन्यात काढण्यात आली होती व महामंडळाने या प्रकल्पासाठी इच्छुक असणा-या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांकडून प्रस्ताव मागवले होते. मात्र, अत्यंत कमी प्रतिसाद मिळाल्याने महामंडळाला या प्रकल्पाकरिता नव्याने निविदा प्रसिद्ध करावी लागली आहे. १ ते ३१ डिसेंबरदरम्यान या बाबतची कागदपत्रे उपलब्ध करावयाची असून १२ जानेवारीपर्यंत निविदा सादर करावयाच्या आहेत. अगोदर जाहीर करण्यात आलेल्या अटी-शतीर्ंमध्ये चटईक्षेत्र तसेच इतर काही बाबींसंदर्भात बदल करण्यात आले असून नव्याने प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले असल्याचे बेदरकर यांनी सांगितले. इच्छुक विकासकांना नव्याने प्रस्ताव सादर करावे लागणार असल्याचेही ते म्हणाले.

Story img Loader