* बुटीबोरीत इंडोरामा वसाहतीतील घरांचे हस्तांतरण
* बुटीबोरी बसस्थानकाबाबत महिनाभरात निर्णय
बुटीबोरी येथे एक महिन्यात बस स्थानकाला जागा देण्यासंबंधी निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केली. औद्योगिक क्षेत्रातील लेबर सेस व इतर सर्व समस्यांसंदर्भात लवकरच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने बुटीबोरी औद्योगिक वसाहत परिसरात इंडोरामातील कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या २७२ घरकुलांचे उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते कामगारांना मंगळवारी वितरण करण्यात आले.
बुटीबोरी येथील पंचतारांकित औद्योगिक परिसरातील वीर सावरकर नगरात इंडोरामा कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेतर्फे ही घरे बांधण्यात आली आहेत. तेथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार देवेंद्र फडणवीस होते. नितीन गडकरी, विजय घोडमारे, चंद्रशेखर बावनकुळे, सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, विकार कुंभारे, सुधीर पारवे, नागो गाणार, खुशाल बोपचे हे आमदार, महापौर अनिल सोले, उपमहापौर संदीप जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गोतमारे, महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगरानी, नागपूर नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेश लोया, विदर्भ प्रिमिअर सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र दुरुगकर, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत अंबासेलकर, भाजपचे ग्रामीण अध्यक्ष डॉ. राजीव पोद्दार याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.
इतक्या कमी दराने घरे बांधली जातात, यावर विश्वासच बसला नाही. सांगणे वेगळे आणि कृती करणे वेगळे. गडकरींनी ते यशस्वीपणे करून दाखविले, ही कौतुकास्पद बाब असून त्यासाठी धन्यवाद शब्द थिटा पडेल. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाजवळ ६० हजार हेक्टर रिक्त जमीन असून त्यापैकी २० टक्के जमीन केवळ कामगारांच्या घरांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. या जमिनीवर घरे बांधण्याचे कंत्राट तुम्ही घ्या, आमची तयारी आहे. एवढय़ा स्वस्त दरात घरे बांधून देऊन उत्तम काम केले. हे सातत्याने करीत रहा, आमचे नेहमीच सहकार्य राहील. खरे म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर गडकरी दिल्लीला गेले आणि नागपूरला विसरले असतील, असे वाटले. हे काम बघून ते ना नागपूरला विसरले ना गरिबांना, हे सिद्ध झाले, या शब्दात उद्योग मंत्री नारायण राणे यांनी नितीन गडकरींचे कौतुक केले. ही घरे माणसांना (इन्सान), कामगारांना दिलेली आहेत, असे स्पष्ट करून चांगला संसार करा, सुख-शांतीने रहा, सुखाने रहा, असे, आवाहन राणे यांनी कामगारांना केले.
‘अॅडव्हांटेज विदर्भ’च्या आयोजनातून विदर्भात सर्वाधिक उद्योग यावेत आणि रोजगार वाढावा, असाच शासनाचा प्रयत्न आहे. शासनाच्या जुन्या औद्योगिक धोरणानंतर विदर्भात सर्वाधिक ३०७ उद्योग आले. नव्या धोरणातही येथील उद्योग वाढावेत, असाच प्रयत्न आहे. येथील लोकप्रतिनिधी व उद्योजकांनी प्रस्ताव सुचवावेत, त्याचाही सकारात्मक विचार केला जाईल, असे राणे म्हणाले.
उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केवळ १५ रुपये वर्गफूट दराने घरे उपलब्ध करून दिली व त्यामुळे घरे बांधणे शक्य झाल्याचा उल्लेख नितीन गडकरी यांनी केला. घरे बांधू न शकणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. ५०० वर्गफूटपेक्षा कमी आकाराची घरे असतील तर त्यावर लेबर सेस वगैरे बाबी कमी कराव्या. औद्योगिक क्षेत्रात यापुढे किमान ५०० फूट जागा कामगांच्या घरांसाठी राखीव ठेवावीत, सर्वच कामगारांना घरे मिळावीत, अशी मागणी नितीन गडकरी यांनी उद्येगमंत्र्यांना केली. राणे-गडकरींच्या दूरदृष्टीने कामगारांसाठी दूरदृष्टीने घरे बांधता आली, असा उल्लेख करून आमदार देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘अॅडव्हांटेज विदर्भ’साठी पूर्वतयारी मोठय़ा प्रमाणात व्हायला हवी. सर्व लोकप्रतिनिधी आणि उद्योजकांशी सखोल चर्चा करून त्याचे ‘ब्ल्यू प्रिंट’तयार व्हायला हवी, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
प्रारंभी इंडोरामा कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजकुमार शर्मा, सचिव देवेंद्र काटोलकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. नारायण राणे यांनी फित कापून तसेच तीन कुटुंबांना घराच्या किल्ल्या देऊन लोकार्पण केले.
एमआयडीसीतील समस्यांबाबत सकारात्मक निर्णय -उद्योगमंत्री
* बुटीबोरीत इंडोरामा वसाहतीतील घरांचे हस्तांतरण * बुटीबोरी बसस्थानकाबाबत महिनाभरात निर्णय बुटीबोरी येथे एक महिन्यात बस स्थानकाला जागा देण्यासंबंधी निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केली.
First published on: 16-01-2013 at 03:10 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Midc taking the positive decision for there problems industry minister