महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने राज्यातील आपल्या २८ औद्योगिक क्षेत्रांतील घरगुती पाण्याच्या दरात प्रति एक हजार लिटरमागे १४ ते १५ रुपये  वाढ केली आहे. या दरवाढीविरोधात रहिवाशांनी नाराजी व्यक्त केल्याने एमआयडीसीने त्यामध्ये तीन ते चार रुपयांनी कपात करण्याचा विचार सुरू केला आहे. लवकरच या दरवाढीचा सुधारित अध्यादेश जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती औद्योगिक विकास महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
एमआयडीसीतील घरगुती पाणी दर प्रतिहजार लिटरमागे आठ रुपये ५० पैसे, तसेच काही ठिकाणी नऊ रुपये असा होता. १ डिसेंबरपासून एमआयडीसीने या पाणी दरात अडीच पट म्हणजे १४ ते १५ रुपये वाढ करून त्याची अंमलबजावणी सुरू केली होती. ही पाणी दरवाढ अन्यायकारक असल्याची टीका होऊ लागल्याने एमआयडीसीने हे दर तीन ते चार रुपयांनी कमी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. वीज वितरण मंडळाने वीज दरात २३ ते ६३ टक्के वाढ केली आहे. यामुळे एमआयडीसीचा पाणी यंत्रणेवरील देखभाल, दुरुस्ती खर्च वाढल्याने एमआयडीसीने ही दरवाढ केली आहे. दरम्यान, डोंबिवली एमआयडीसी रहिवासी संघाने या दरवाढीविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. एमआयडीसीने ही बिले पाठवली तर तिचा भरणा करणार नाही, असा इशारा रहिवासी संघाने दिला आहे. पुढील वर्षी येणारी पाणी देयके जुन्या दराने पाठविण्यात यावीत, अशी मागणी संघाच्या अध्यक्षा रश्मी येवले, राजू नलावडे यांनी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.
कल्याणकरांना दिलासा
एमआयडीसीने महापालिकांना पुरविण्यात येणाऱ्या पाणी दरातही वाढ केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने आपल्या वाटणीचे जे १०० दशलक्ष लिटर पाणी एमआयडीसीकडून घेण्याऐवजी थेट शासनाच्या लघू पाटबंधारे विभागाशी करार करून उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या वाढीव पाणी कराचा कल्याण- डोंबिवलीतील जनतेवर बोजा पडणार नाही. दरवर्षी पाणी देयकापोटी पालिका एमआयडीसीला सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये अदा करते.

Story img Loader