वर्षभरापूर्वी पाणी दरवाढ करून ग्राहकांकडून वर्षभर देयकातून वसूल केलेली रक्कम ग्राहकांना परत करण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घेतला आहे. ग्राहकांना नव्याने देण्यात येणाऱ्या पाणी देयकामधून ही रक्कम वळती करण्यात येईल, असे एमआयडीसीतील वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले.
विजेचे दर वाढल्याने गेल्या दीड वर्षांत एमआयडीसीने विद्युत नियामक आयोगाच्या सूचनेवरून पाणी दरवाढ केली होती. ही दरवाढ अन्यायकारक असल्याची टीका होऊ लागली होती. याप्रकरणी एमआयडीसी परिसरात राहाणाऱ्या रहिवाशांनी मोर्चे काढून ही दरवाढ रद्द करण्याची मागणी केली होती. काही महिने रहिवाशांनी पाणी देयक भरणा रद्द करून प्रशासनाचा निषेध केला होता. शासन आणि न्यायिक यंत्रणांनी या विषयाची दखल घेऊन पाणी दर कमी करण्याचे आदेश एमआयडीसीला दिले होते. सुधारित दराप्रमाणे एमआयडीसीचे पाणी वापरणाऱ्या ग्राहकांना सुमारे ५० ते ६० टक्के कमी दराने पाणी देयके येतील असे एमआयडीसीतील सूत्रांनी स्पष्ट केले. गेल्या डिसेंबर महिन्यात एमआयडीसीने औद्योगिक पाण्याचे दर एक हजार लिटरला ३० ते ३८ रुपये, निवासी विभागासाठी १३ ते १६ रुपये आणि नगरपालिका, ग्रामपंचातींसाठी ५ ते ७ रुपये आकारले होते. मागील महिन्यात एमआयडीसीने वाढीव पाणी दर विभागाप्रमाणे अनुक्रमे ८.२५ रुपये, २२.५० रुपये आणि ४.५० रुपये केले आहेत. सुधारित पाणी दरामुळे ग्राहकांना तीन रुपये ते सात रुपये फरकाने कमी पाणी देयक येणार आहे. सुधारित पाणी देयकाची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता शंकर जगताप यांनी सांगितले.

Story img Loader