दिघा एमआयडीसी परिसरातून ३५ वर्षांपूर्वी १५९० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली होती. या जलवाहिनीच्या बाजूला बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या झोपडय़ांमधील रहिवाशांनी पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जलवाहिनीला सातत्याने फोडण्यात येत होत्या. त्याचप्रमाणे जलवाहिन्या जुन्या झाल्याने अनेकदा उच्चदाबामुळे त्या फुटल्याने २४ तास पाण्याची गळती होऊन दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत होती. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ५ कोटी रुपये खर्च करून १००० मीटरच्या जलवाहिनीची नुकतीच दुरुस्ती केली आहे. एमआयडीसीला जलवाहिनीची दुरुस्तीसाठी दर शुक्रवारी पाणीपुरवठा बंद करावा लागत होता. यामुळे या दिवशी परिसरातील पाणीपुरवठा बंद ठेवावा लागत होता. तसेच शनिवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. दुरुस्तीनंतर जलवाहिन्या पुन्हा फोडण्यात येत असल्याने एमआयडीसीचा खर्चदेखील व्यर्थ जात होता. पाण्याची नासाडी आणि पोणी चोरी रोखण्यासाठी दिघा एमआयडीसीतील यादव नगर, चिंचपाडा, रबाले येथील १००० मीटरच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम नुकतेच केले आहे. ज्या ठिकाणी जलवाहिनी फोडण्यात येते त्या ठिकाणी वाहिन्याच्या सभोवती संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे.
यासाठी ५ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे शुक्रवारी बंद करण्यात येणारा पाणीपुरवठा हा तूर्तास तरी सुरू असल्याने नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा