महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने कल्याण-डोंबवलीपाठोपाठ ठाणे महापालिकेस करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठय़ाच्या दरांमध्ये प्रती एक हजार लिटरमागे तब्बल सहा रुपयांची वाढ केल्याने महापालिकेवर वर्षांकाठी सुमारे २५ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ठाणे महापालिका दररोज १०० दक्षलश लिटर इतके पाणी विकत घेते.
ठाणे, कळवा आणि मुंब्रा या परिसरातील नागरिकांना दररोज सुमारे ५०० दक्षलश लिटर इतका पाण्याचा पुरवठा केला जातो. कळवा-मुंब्रा, वागळे इस्टेट, रामनगर, हनुमाननगर, कैलासनगर आणि दिवा भागाला औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) पाणीपुरवठा करण्यात येतो. ठाणे महापालिकेची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना असून त्यातून शहराला सुमारे २२० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. यासाठी भातसा धरणातून पाणी उपसण्यात येते. याशिवाय स्टेम पाणीपुरवठा योजनेतूनही ठाणेकरांना पाणी मिळते. असे असले तरी दररोज सुमारे १०० दक्षलश लिटर पाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विकत घेतले जात असल्याने या पाण्यावर शहराचे नियोजन अवलंबून असते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ठाणे जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या शहरांना यापूर्वी प्रती हजार लिटर नऊ रुपये या दराने पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. मात्र डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीस औद्योगिक विकास महामंडळाने यामध्ये तब्बल सहा रुपयांची वाढ केल्याने जिल्ह्यातील महापालिका आणि नगरपालिकांचे आर्थिक गणित बिघडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कल्याण-डोंबिवलीपाठोपाठ ठाणे महापालिकेच्या तिजोरीवर या वाढीमुळे सुमारे २५ कोटी रुपयांचा भार पडणार आहे, अशी माहिती महापालिकेतील पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. मार्च २०१४ पर्यंत यामुळे अतिरिक्त आठ कोटी रुपये भरावे लागणार आहेत. पाणी दरात एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने महापालिका आणि नगरपालिकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत असला तरी हे गणित बसविण्याशिवाय पर्याय नाही, असे मत वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केले. दरम्यान ही दरवाढ ठाणेकरांवर लादली जाणार नाही, अशी माहिती महापालिकेतील एका वरिष्ठ राजकीय पदाधिकाऱ्याने दिली. काही महिन्यांपूर्वीच ठाण्यातील पाणी दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे अशी कोणत्याही दरवाढीस मंजुरी दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader