नागापूर औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उभारलेले आधुनिक अग्निशमन केंद्र, सात महिन्यांत, म्हणजे येत्या ऑक्टोबरमध्ये कार्यान्वित होईल, असे आश्वासन महामंडळाचे उपमुख्य अग्निशमन अधिकारी संतोष वारिक (मुंबई) यांनी दिले आहे. येथील उद्योजक व राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे माजी जिल्हाध्यक्ष वधवा यांना त्यांनी तसे पत्र पाठवले आहे.
अग्निशमन केंद्राचे बांधकाम व इतर कामे येत्या महिन्याभरात पूर्ण होतील, त्यानंतर तेथे प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी नियुक्त करुन केंद्र ऑक्टोबरमध्ये कार्यान्वित केले जाईल, असे वारिक यांनी पत्रात म्हटले आहे. एमआयडीसीत अग्निशमन केंद्राची सुविधा उपलब्ध असावी, अशी उद्योजकांची मागणी आहे, त्यासाठी आंदोलनेही झाली.
सुमारे ४ कोटी रुपये खर्चाच्या या केंद्राचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर आहे. ४० अधिकारी व कर्मचारी तेथे असतील, अत्याधुनिक पद्धतीची ५ वाहने व इतर यंत्रसामुग्री तेथे तैनात असेल. बांधकाम पुर्ण होताच तेथे पुर्ण क्षमतेने केंद्र कार्यान्वित व्हावे, यासाठी वधवा यांनी महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिले होते. आता ऑक्टोबरमध्ये केंद्र कार्यान्वित करताना ते पुर्ण क्षमतेने करावे, अशी अपेक्षा वधवा यांनी व्यक्त केली.

Story img Loader