कोळशाच्या वाढत असलेल्या किमतीमुळे मिहानचा वीजपुरवठा थांबविण्याचा निर्णय नाईलाजाने अभिजित ग्रुपने घेतला होता, मात्र उद्योगांना अडचणीत आणणे हा आमचा हेतू नाही. यावर काहीतरी तोडगा निघेल अशी आम्हाला आशा आहे, तोपर्यंत वीजपुरवठा सुरूच ठेवणार असल्याचे अभिजित ग्रुपतर्फे वीज नियामक आयोगापुढे मंगळवारी सांगण्यात आले.
मिहान प्रकल्पातील उद्योगांना वीजपुरवठा करण्यासाठी एमएडीसी व अभिजित ग्रुप यांच्यात करार झाला होता व त्यात २ रुपये २९ पैसे दराने वीज देण्याचे अभिजित समूहाने मान्य केले होते. त्यानुसार वीजपुरवठा करण्यात येत होता, परंतु आता कोळशाच्या किमती आवाक्याबाहेर गेल्याने त्याच दरात वीजपुरवठा करणे शक्य नाही. २५ मार्चपर्यंत हा वीजपुरवठा सुरू राहील, असे एमएडीसीला कळवण्यात आले होते. त्यानुसार २५ मार्चला मुंबईत वीज नियामक आयोगापुढे संबंधित घटकांना आमंत्रित करण्यात आले होते. या खटल्यात अभिजित समूहाला कर्ज देणाऱ्या बँकेनेही पत्र दिले. आम्ही अभिजित समूहाला ११०० कोटीचे कर्ज दिले आहे. या प्रकरणामुळे आमची वसुली थांबली आहे. तेव्हा तोडगा काढण्यात यावा, असे मत व्यक्त करण्यात आले.
अभिजित समूहाने एमएडीसीकडे दोन प्रस्ताव दिले असून त्यात वीज दर वाढवणे व डीजी सेटच्या माध्यमातून वीजपुरवठा करणे यांचा समावेश आहे. या प्रस्तावावर एमएडीसीने विचार करावा, असे आवाहन करण्यात आले. मंगळवारच्या बैठकीत मिहानमधील उद्योजक संघटनेचे पदाधिकारी सहभागी होते.

Story img Loader