राष्ट्रीय शैक्षणिक संस्था मिहानमध्ये सुरू करण्याचा अट्टाहास राज्यकर्त्यांचा असल्याने विदर्भ विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकणारा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या मतदारसंघात असलेल्या मिहान प्रकल्पाची भविष्यात औद्योगिक नव्हे, तर शैक्षणिक वसाहत म्हणून ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे.
आधीच्या सरकारने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या माध्यमातून मिहान प्रकल्प साकारण्याचे ठरवले, परंतु गेल्या १२ ते १३ वर्षांंत केवळ नऊ कंपन्या सुरू होऊ शकल्या आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारने मिहान प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. विजेच्या दराचा काही प्रमाणात प्रश्न मार्गी लावला. मात्र, येथे अद्याप एकही नवीन प्रकल्प आलेला नाही. दुसरीकडे केंद्र सरकारने घोषित केलेल्या विविध राष्ट्रीय शैक्षणिक संस्था मिहान प्रकल्पात सुरू करण्याचा सपाटा राज्य सरकारने लावला आहे.
मिहानमध्ये २०८६ हेक्टर जागेत विशेष आर्थिक क्षेत्र आहे. यातील १४७२ हेक्टर निर्मिती उद्योग आणि ६१४ सेवा क्षेत्राशी संबंधित केंद्र स्थापन करावयाचे आहेत, परंतु येथे निर्मिती उद्योग येण्याचा ओघ आटला असून शैक्षणिक संस्थांचा भरणा होत असल्याचे दिसून येत आहे. शहरात इतरत्र जमीन उपलब्ध असताना स्थानिक राजकीय पुढाऱ्यांचा आग्रह मिहानमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक संस्था उभारण्याचा आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, भारतीय व्यवस्थापन संस्थांसाठी जागा निश्चित झाली असून, भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, राष्ट्रीय औषध निर्माण शिक्षण आणि संशोधन संस्था यांनाही येथे जागा उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे.
पूर्व नागपुरात वाठोडा येथे महापालिकेची साडेचार एकर जमीन आहे. येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था स्थापन करण्यात यावी, अशी मागणी होती. या संस्थेला सलग २०० हेक्टर जमीन आवश्यक आहे. प्रारंभी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाजवळील टी.बी. वॉर्ड आणि केंद्रीय कारागृहाच्या जमिनीचा पर्याय देण्यात आला. दोन तुकडय़ात जमीन नको म्हणून हा पर्याय फेटाळण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन मिहानमधील जमिनीचा प्रस्ताव दिला. या संस्थेसाठी ही जमिनी निश्चित करण्यात आली आहे.
मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात विदर्भासाठी एम्सची घोषणा झाली होती तेव्हापासून पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी पूर्व नागपुरातील वाठोडा येथे एम्स उभारण्याची मागणी करीत होते, परंतु त्यांच्या मागणीकडे भाजपच्या एकाही नेत्याला लक्ष देण्याची आवश्यकता वाटली नाही. यासंदर्भात आमदार कृष्णा खोपडे म्हणाले, एम्ससारखी संस्था शहराच्या मध्यभागी व्हावी म्हणून वाठोडा येथे उभारण्याची मागणी केली होती. वाठोडा येथे संस्थेला आवश्यक २०० एकर जमीन उपलब्ध आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी दोन संस्था प्रस्तावित
गेल्या बारा-तेरा वर्षांपासून मिहानमध्ये सुरू झालेल्या कंपन्यांमध्ये बहुतांश माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित आहेत. नवीन सरकारने मिहानला गती देण्यासाठी येथे राष्ट्रीय शैक्षणिक संस्था उभ्या करण्यास प्रारंभ केला आहे. यात एम्स, आयआयएमकरिता जागा निश्चित झाली असून, आयआयआयटी आणि एनआयपीईआर या संस्था येथे उघडण्याचे प्रस्तावित आहे.

आणखी दोन संस्था प्रस्तावित
गेल्या बारा-तेरा वर्षांपासून मिहानमध्ये सुरू झालेल्या कंपन्यांमध्ये बहुतांश माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित आहेत. नवीन सरकारने मिहानला गती देण्यासाठी येथे राष्ट्रीय शैक्षणिक संस्था उभ्या करण्यास प्रारंभ केला आहे. यात एम्स, आयआयएमकरिता जागा निश्चित झाली असून, आयआयआयटी आणि एनआयपीईआर या संस्था येथे उघडण्याचे प्रस्तावित आहे.