तालुक्यातील दळवट या भूकंपप्रवण क्षेत्रास मंगळवारी सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के बसले. या धक्क्यांमुळे दळवटचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले असून ग्रामस्थांकडून वारंवार मागणी होऊनही परिसरातील अनेक समस्या जैसे थे स्वरूपात आहेत. या परिसरात कायमस्वरूपी यंत्रणा बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी पुन्हा एकदा केली आहे.
मंगळवारी बसलेल्या धक्क्यांची नोंद रिश्टर स्केलवर २.८ अशी झाली. हा धक्का अतिशय सौम्य स्वरूपाचा असला तरी या भागात अधूनमधून जमिनीतून वेगवेगळ्या स्वरूपाचे आवाज येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या पाश्र्वभूमीवर मंगळवारी धक्के बसल्यानंतर त्यांची क्षमता कमी असली तरी ग्रामस्थांमध्ये भीती पसरू नये यासाठी तहसीलदार अनिल पुरे यांनी दळवट परिसरास भेट देऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
दळवट या भूकंपप्रवण क्षेत्रात जिरवाडा, चिंचपाडा, अभोणा, कनाशी, जामले, हातगड, करंभेळ, शिंगाशी, बोरगाव, खिराड, वेरुळे, जिरवाडा, बापखेडा, देसगाव, जामले, बोरदैवत, देवळीवणी, अंबिका या गावांचा समावेश होतो. या सर्व गावांतील ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी सावध राहण्याचा इशारा तहसीलदार पुरे यांच्यासह गटविकास अधिकारी मधुकर शिरसाठ यांनी दिला आहे.
दळवट परिसरास वारंवार भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भागास भूकंपाचे धक्के बसण्याच्या कारणांचा वरिष्ठ पातळीवर अभ्यास सुरू असला तरी ग्रामस्थ सततच्या असुरक्षिततेच्या वातावरणामुळे चांगलेच धास्तावले आहेत. कळवण तालुक्यातील दळवट आणि बोरदैवत परिसरात २०१३ मध्ये सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात सतत सात ते आठ दिवस भूकंपाचे सौम्य धक्के बसत होते. यानंतर दिल्ली येथील तज्ज्ञांच्या पथकाने तालुक्यात सात ते आठ दिवस मुक्काम ठोकत या भागातील भूगर्भाचा अभ्यास केला होता. दळवट परिसरास २००२ मध्ये ६.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद आहे. त्या वेळी मोठय़ा प्रमाणात वित्तहानीही झाली होती. त्यानंतर भयभीत झालेले ग्रामस्थ काही दिवस घरांबाहेर राहुटय़ा टाकून राहत होते. परिसरात वारंवार होणाऱ्या अशा घटनांची नोंद घेऊन भूकंपमापक यंत्रणाही कार्यरत करण्यात आली होती. परंतु काही दिवसांनी ही यंत्रणाही काढून नेण्यात आली. त्यामुळे सध्या नाशिक येथील ‘मेरी’ संस्थेवर परिसरातील भूकंपविषयक नोंदींसाठी अवलंबून राहावे लागत आहे.

Story img Loader