औरंगाबादचा जिल्हा दूध संघ मराठवाडय़ात क्रमांक एकचा आहे. शेतकरी व सभासदांना योग्य मोबदला दिला जातो. त्यामुळे दुधाच्या संकलनात वाढ झाली. येत्या काही दिवसांत स्वच्छ दूध योजनेंतर्गत २ कोटी ९२ लाख रुपये निधी मिळणार असल्याची माहिती दूध संघाचे अध्यक्ष कचरू मोहनराव डिकेपाटील यांनी दिली.
जिल्हा दूध संघाची निवडणूक जवळ आली असल्याने गेल्या वेळी निवडणुकीत विरोधात उभ्या असणाऱ्या पॅनेलने जाणीवपूर्वक बदनामी सुरू केल्याचे डिकेपाटील यांनी सांगितले. औरंगाबाद जिल्हा दूध संघात कर्ज प्रकरणांवरून झालेल्या अपहाराच्या कलम ८८ च्या चौकशीत संचालक मंडळ दोषी असल्याचे अहवाल लेखा परीक्षकांनी दिले होते. या अहवालाचा आधार घेत विरोधक नाहक बदनामी करीत आहेत. वास्तविक, यातील सर्व खुलासे संबंधित यंत्रणांकडे केले असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
सन १९९७ मध्ये संचालक मंडळाकडे दूध संघाचा कारभार आल्यानंतर तीन शीतकेंद्रांची उभारणी करण्यात आली. त्यावर साडेतीन कोटी खर्च करण्यात आला. तसेच दूध संघाची प्रशासकीय इमारतही उभारण्यात आली.
गांधेली दूध शाळेसाठी आयएसओ नूतनीकरण व दुग्धजन्य पदार्थासाठी नवीन यंत्रसामुग्री खरेदी करण्यात आली. त्यासाठी सुमारे एक कोटी खर्च करण्यात आले. दूध उत्पादकांना कडबाकुटी व दूध चाचणी साहित्य अनुदानातून देण्यात आले. १६ वर्षांत ८० लाख अनुदान वाटप केल्याचा दावा कचरू डिकेपाटील यांनी केला. स्वच्छ दूध निर्मितीअंतर्गत दुधात बॅक्टेरिया वाढू नये, या साठी बल्क कुलर खरेदी करण्यात आले. निरसे दूध अध्र्या तासाच्या आत बल्क कुलरमध्ये साठविले गेले तर त्यात बॅक्टेरियाचे प्रमाण राहत नाही. असे दूध पिशवीतून ९० दिवस टिकू शकते. या साठी आवश्यक प्रयोगशाळा विकसित करण्यात आली. दूध संघ नफ्यात असून दूध उत्पादकांना शासन दरापेक्षा अधिकचा एक रुपया वाढवून दिला जात असल्याचे डिकेपाटील यांनी सांगितले.
दोन लाख लुटल्याचा गुन्हा
धुळे-चाळीसगाव रस्त्यावरील राजरत्न जिनिंग मिलमध्ये ‘औरंगाबाद दूध संघ, औरंगाबाद’ हे नाव असणाऱ्या पांढऱ्या बोलेरो गाडीतून आलेल्या तिघांनी चाकूचा धाक दाखवून २ लाख रुपये लुटल्याचा गुन्हा ४ फेब्रुवारीला धुळे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. जिनिंग मिल मालक पद्मसिंह राजेंद्र काळे यांनी या संदर्भातील फिर्याद दिली. औरंगाबाद दूध संघाचे गाडीवर नाव असल्याने त्याच्या चौकशीसाठी धुळे पोलीस गुरुवारी जिल्हा दूध संघात धडकले. विशेष म्हणजे ती गाडी दूध संघाचीच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ज्या तीन व्यक्तींनी जिनिंग मालकाला धमकावले, त्यातील दोघांची नावे फिर्यादीने पोलिसांना सांगितली. माणिकराव आणि जैस्वाल अशा अर्धवट नावांच्या आधारे पोलीस तपास करीत होते. तेव्हा जैस्वाल हे या दूध संघाचे संचालक असल्याचे त्यांना समजले. ही घटना ४ फेब्रुवारीला संध्याकाळी साडेसात वाजता घडली. ज्या गाडीतून या तीन व्यक्ती उतरल्या होत्या, ती गाडी औरंगाबाद दूध संघाचीच असल्याने त्यातील आरोपी संचालक जैस्वालच होते का, याचा तपास पोलीस करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा