चांगल्या प्रतीचा दूधपुरवठा केल्यास चांगला दर मिळतो; पण दूध दरफरक देताना लिटरवर दिल्यास चांगल्या दुधाचा पुरवठा करणाऱ्यांवर अन्याय होतो. यासाठी दूध दरफरक लिटरवर न देता एकूण खरेदीच्या किमतीवर टक्केवारीप्रमाणे देण्यात यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी ‘गोकुळ’ दूध संघाच्या रविवारी झालेल्या ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र शासनानेही दुधाला अनुदान द्यावे, असा ठरावही सभेत करण्यात आला. अध्यक्षस्थानी ‘गोकुळ’ चे अध्यक्ष अरुण डोंगळे होते.
जिल्हा दूध संघाकडून दीपावलीनिमित्त दूध उत्पादक सभासदांना देण्यात येणारा दूध दरफरक हा प्रतिलिटरला न देता एकूण रकमेच्या टक्केवारीप्रमाणे देण्यात यावा, असे श्रीपती पाटील व दत्तात्रय बोळावे यांनी मागणी करताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून या मागणीला साथ दिली.
हसूर दुमाला येथील हनुमान दूध संस्थेचे सभासद श्रीपती पाटील यांनी संघाच्या अहवाल सालातील उत्पादन व व्यापारी पत्रकातील दूध खरेदीमध्ये म्हैस व गाय दुधाची स्वतंत्र खरेदी दाखविण्याची सूचना केली. दूध दरफरक देताना गतवर्षी व यावर्षी जरी बरोबर असला, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत दरफरकामध्ये एक टक्का फरक असल्याचे सांगून मुद्दय़ाला हात घातला. गतवर्षीच्या दुधाचा दर आणि या वर्षीच्या दूध दराची तुलना केली तर मोठा फरक आहे.
 या चर्चेत हस्तक्षेप करत सांगरूळचे दत्तात्रय बोळावे यांनी टक्केवारीचे गणितच मांडले. या चर्चेवेळी भोगावतीचे माजी संचालक विजय डोंगळे यांनी दूध दरफरक देण्याची सध्याची संघाची पद्धत योग्य आहे असे सांगत यात काही बदल करावयाचा असेल तर अभ्यासू लोकांचा सल्ला घ्या, अशी सूचना केली. अध्यक्ष डोंगळे यांनी यावर योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर या चर्चेवर पडदा पडला. चालू अहवाल सालात संघाने आर्थिक वर्षांमध्ये संकलन व दुग्धशाळा खर्चाची टक्केवारी गतवर्षीपेक्षा वाढवून दिली आहे, खर्चावर मर्यादा घालावी, अशी मागणी बोळावे यांनी केली. शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष पी. डी. पाटील यांनी यामध्ये दूध संस्थांचे भाग भांडवल ३६ कोटी ७१ लाख रुपये संघाकडे असल्याचे सांगितले. उत्पादक सभासदांसाठी असलेल्या भविष्यनिर्वाह निधीचाही आलेख असावा, अशी सूचना विजय डोंगळे यांनी केली. बाबुराव गुरव यांनी इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र शासनानेही दूध संघांना किमान दहा लिटरला १० रुपये इतके अनुदान द्यावे, असा ठराव मांडला.     

Story img Loader