गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न त्वरीत सोडविण्यात आला नाही, तर येत्या १६ जानेवारी रोजी मलबार हिल येथील मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या ‘वर्षां’ निवासस्थानी गिरणी कामगार धडक देतील, असा इशारा देण्यात आला आहे.
गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले होते. म्हाडाने गिरण्यांच्या जमिनीवर बांधलेल्या ६९२५ घरांची लॉटरी काढूनही त्याचा ताबा कामगारांना मिळालेला नाही. गिरण्यांच्या उपलब्ध असलेल्या जमिनीवर सुमारे सहा हजार घरे बांधण्यात येणार आहेत. परंतु म्हाडाकडून घरबांधणीला सुरुवातच झालेली नाही. एमएमआरडीएची ३७ हजार घरे गिरणी कामगारांना देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. परंतु त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. अनेक गिरण्यांच्या मालकांनी जमिनी दिलेल्या नाहीत. सरकार त्यांच्याविरुद्ध कारवाई का करीत नाही, असा सवाल कामगार नेते दत्ता इस्वलकर यांनी केला आहे.राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या गिरण्या संयुक्त कराराद्वारे खासगी मालकांना चालविण्यासाठी देण्यात आल्या आहेत. या संदर्भात चौकशी करण्याचे आश्वासन पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले होते. मात्र त्यांचे हे आश्वासनही हवेत विरले आहे, असे ते म्हणाले. गिरणी कामगारांना मुंबईतून हद्दपार करण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोप दत्ता इस्वलकर यांनी केला.
राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या सात गिरण्या बंद असून त्यांच्या ७३ एकर जमिनीवर घरे बांधल्यास १ लाख ४८ हजार कामगारांच्या घराचा प्रश्न सुटू शकेल. हा प्रश्न येत्या १५ जानेवारीपर्यंत सोडविण्यात यावा. अन्यथा १६ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षां’ निवासस्थानी गिरणी कामगार धडकतील, असा इशारा दत्ता इस्वालकर यांनी दिला. १६ जानेवारी राजी सायंकाळी ग्रॅन्ट रोड रेल्वे स्थानकाबाहेर (पश्चिम) जमून गिरणी कामगार ‘वर्षां’ निवासस्थानी रवाना होणार आहेत.

Story img Loader