गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी  ‘म्हाडा’ने काढलेल्या सोडतीत घरे मिळालेल्या अर्जदारांना घरे वाटपाच्या प्रक्रियेला नानाविध कारणांचा खो बसत असल्याने या ६९२५ घरांच्या बांधकामासाठी खर्च केलेल्या सुमारे ६०० कोटी रुपयांच्या वसुलीची चिंता ‘म्हाडा’ला सतावित आहे.
‘म्हाडा’तर्फे ६९२५ घरांसाठी जूनच्या अखेरीस सोडत काढण्यात आली होती. यशस्वी अर्जदारांना घर मिळाल्याबाबतचे सूचनापत्र पाठविणे आणि त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रे गोळा करण्याचे काम मुंबै बँकेला सोपवण्यात आले असून ते काम सुरू आहे. आतापर्यंत ६१५६ यशस्वी अर्जदारांची कागदपत्रे जमा झाली आहे.
यशस्वी अर्जदारांनी कागदपत्रे जमा केल्यानंतर त्यांची छाननी होईल. त्यात कागदपत्रांची वैधता तपासण्यात येईल आणि कामगारांच्या वारसदारांच्या वारसाप्रमाणपत्राची खातरजमा केली जाईल. ही सर्व प्रक्रिया पार पडून पात्रता निश्चित झाल्यानंतर यशस्वी अर्जदाराने घरापोटी साडेसात लाख रुपये जमा करायचे आहेत. पण कधी वारसाप्रमाणपत्राचा मुद्दा तर आता कामगार म्हणून पात्र असल्याच्या निकषांची पूर्तता असे वादाचे मुद्दे पुढे येऊन घरवाटप प्रक्रिया रखडत आहे.
गिरणी कामगारांसाठीची ही ६९२५ घरे गेल्या वर्षभरापासून तयार आहेत. त्यावर ‘म्हाडा’चे सुमारे ६०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. वर्षभरापासून ही रक्कम अडकून पडली आहे. आता वारसाप्रमाणपत्र व कामगार म्हणून काम केल्याच्या दिवसांचा प्रश्न आल्याने प्रक्रिया आणखी रखडणार अशी चिन्हे असल्याने आमचे पैसे आणखी किती काळ अडकून पडणार, हा आमच्यादृष्टीने चिंतेचे विषय आहे, असे ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader