गिरणी कामगारांच्या घरांसाठी ‘म्हाडा’ने काढलेल्या सोडतीत घरे मिळालेल्या यशस्वी अर्जदारांना कागदपत्रे जमा करण्यासाठी १६ ते ३० नोव्हेंबरची मुदतवाढ देण्यात आली असली तरी कामगार म्हणून किती दिवस काम केले या निकषावरून गिरणी कामगारांच्या पात्रतेचा प्रश्न आल्याने आतापर्यंत जमा झालेल्या कागदपत्रांची छाननी थांबविण्यात आली आहे. त्यामुळे गिरणी कामगारांच्या गृहस्वप्नाला आणखी विलंब लागण्याची चिन्हे आहेत.
‘म्हाडा’तर्फे ६९२५ घरांसाठी जूनच्या अखेरीस सोडत काढण्यात आली होती. यशस्वी अर्जदारांना घर मिळाल्याबाबतचे सूचनापत्र पाठवणे आणि त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रे गोळा करण्याचे काम मुंबै बँकेला सोपविण्यात आले. त्यानुसार यशस्वी अर्जदारांना सूचनापत्रे पाठविण्यात आली. आतापर्यंत ६१५६ अर्जदारांनी कागदपत्रे जमा केली आहेत व ७५१ अर्जदारांची कागदपत्रे जमा व्हायची आहेत.
कागदपत्रे जमा होतील त्यानुसार त्यांची छाननी करण्यासाठी ‘म्हाडा’चा एक अधिकारी तर पात्रता निकष आणि वारसाहक्काबाबतच्या छाननीसाठी कामगार विभागाचा एक अधिकारी अशा दोन अधिकाऱ्यांची एकूण १६ पथके तयार करण्यात आली. त्यांनी छाननीचे काम सुरू केले पण सोडतीत अवघे काही दिवस काम केलेल्या कामगारांना घरे मिळाली तर वर्षांनुवर्षे कामगार म्हणून काम केलेले कामगार वंचित राहिले, अशी तक्रार काही गिरणी कामगार संघटनांनी केली. कामगार म्हणून पात्र ठरण्यासाठी किमान २४० दिवस कामावर असल्याचा निकष पूर्ण न करणाऱ्यांना कसे काय पात्र धरायचे, असा प्रश्न त्यामुळे ऐरणीवर आला. त्यामुळे कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हा प्रश्न सरकवला आहे. या सर्व गोंधळामुळे छाननी प्रक्रिया थांबली आहे. गिरणी कामगारांसाठीची ही ६९२५ घरे गेल्या वर्षभरापासून तयार आहेत. पण कधी घरांच्या दराचा मुद्दा तर कधी पहिल्या सोडतीत कोणाला सामील होता येईल अशा नानाविध कारणांमुळे सोडत लांबत गेली. अखेर एकदाची सोडत झाली तर आता वारसाप्रमाणपत्र आणि कामगार म्हणून पात्रतेचा मुद्दा वादाचा ठरत आहे. त्यामुळे यशस्वी अर्जदारांच्या गृहस्वप्नाची पूर्ती होण्यास आणखी विलंब लागत आहे.     
२३४ विजेते अद्याप बेपत्ता
यशस्वी अर्जदारांना बँकेने पाठवलेली ६५२ सूचनापत्रे अर्जदार मृत झाल्याने वा घर बदलल्याने परत आली. त्यानंतर ‘म्हाडा’ने त्यांची यादी प्रसिद्ध करत जाहीर आवाहन केले. नंतर त्यापैकी ४१८ लोकांनी ओळखपत्र दाखवून, मयत कामगारांच्या वारसांनी मृत्यूदाखला दाखवून सूचनापत्र नेले. तरीही २३४ अर्जदार अद्याप ‘बेपत्ता’ असून त्यांची सूचनापत्रे बँकेकडे आहेत.    

Story img Loader