‘धम्म मिला तथागत का, लोग दीक्षाभूमी आए, भीमजी का करिश्मा ये, आज जीवन में लहराए’ असे म्हणत लाखो बौद्ध बांधवांचा जनसागर बुधवारपासून दीक्षाभूमीवर मुक्कामास आहे. मिळेल त्या सावलीखाली आसरा शोधून फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्धांवरील अपार श्रद्धेमुळे भर उन्हात ते या ठिकाणी जमलेले आहेत. मराठवाडय़ाहून येणाऱ्या अनुयायांची संख्या अधिक असून, उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यातील अनुयायीसुद्धा मोठय़ा प्रमाणावर या ठिकाणी आल्याचे पोहायला मिळाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी लाखो बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली तेव्हापासून त्यांचे अनुयायी दरवर्षी न चुकता दसऱ्याला दीक्षाभूमीवर येतात. या अनुयायांकरिता प्रशासनाने व्यवस्था केली असली तरीही ती अपुरीच असल्याचे या ठिकाणी जाणवले. कारण, विविध वस्तू, पुस्तकांच्या स्टॉल्सने दीक्षाभूमीचा अर्धाअधिक परिसर व्यापलेला आहे. डोक्यावर प्रचंड उन्ह असल्यामुळे दीक्षाभूमीच्या लॉनवर असलेल्या लहानसहान झाडांखालीच त्यांनी आसरा शोधला आहे. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आल्यामुळे दीक्षाभूमीच्या आत बाबासाहेबांच्या आणि गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन लॉनवरील झाडाखालीच त्यांनी अंग टाकले होते. दीक्षाभूमीच्या परिसरात ही स्थिती होती, तर दीक्षाभूमीबाहेर फुटपाथवर कित्येक अनुयायांनी बस्तान मांडले होते. जेवढे अनुयायी तेवढीच पोलिसांची संख्या या परिसरात दिसून येत होती. त्याच ठिकाणी प्रशासनाने तात्पुरते नळ दिल्याने रस्त्यावर पाण्याचे लोट वाहत असलेले दिसून आले. त्यांच्यासाठी खाण्याची व्यवस्था तर होती, पण केरकचरा साठवण्याची व्यवस्था अपुरी असल्याने आतापासूनच दीक्षाभूमीचा परिसरात आणि बाहेरची अन्नाची पाकिटे अस्ताव्यस्त पडलेली होती. मात्र, अशा परिस्थितीतही या अनुयायांचा उत्साह मात्र कायम होता. बुधवारी या ठिकाणी सुमारे एक हजार अनुयायांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, तर आज हा आकडा दोन हजाराचा टप्पा आणि उद्या त्याहूनही अधिक टप्पा पार करेल, असे दीक्षा नोंदणी कक्षातून सांगण्यात आले.
दीक्षेनंतर आम्ही मोहमुक्त.. उत्तरप्रदेशातल्या संबल जिल्ह्यातून श्रीराम गौतम आणि त्यांच्या पत्नी अनेक वर्षांंपासून येत आहे. १९६५ मध्ये आग्रा येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, पण तीन वर्षांपूर्वी नागपुरातल्या दीक्षाभूमीवर घेतलेल्या दीक्षेनंतर खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माचा स्वीकार आम्ही केल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हापासूनच दारू, मांस, मटण यासारख्या वस्तूचा मोह सोडून दिला आणि आमच्या जीवनात आनंद पसरला, त्यामुळेच बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी आम्ही आयुष्य वाहून घेतल्याचेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा