काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व युडिएफ यांना टक्कर देण्यासाठी महाराष्ट्रात नांदेडनंतर अकोल्यात ऑल इंडिया मल्लीस ए इत्तेहादूल मुसलमीन अर्थात, एमआयएम आपले पावले टाकणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. एका राष्ट्रीय पक्षात नाराज असलेल्या एका मुस्लिम नेत्याने नुकतीच हैदराबाद येथे एमआयएमच्या प्रमुखांशी सदिच्छा भेट घेऊन या संदर्भातील प्रस्ताव सादर केला. एमआयएम अकोल्यात आणण्यासाठी या राजकीय नेत्याने सुरू केलेल्या प्रयत्नांमुळे इतरांच्या पोटात गोळा येण्याची चिन्हे आहेत.
अकोला शहरात मुस्लिम समाजाची संख्या मोठी आहे. अकोला पश्चिम या विधानसभा मतदार संघात मुस्लिमांची मते निर्णायक ठरतात. काँग्रेसला परंपरागत मुस्लिम मतांचा या मतदार संघात गेल्या चार निवडणुकीत कुठलाच दृष्य फायदा झालेला नाही. त्यामुळे मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व थेट विधानसभेत पोहोचण्यास मोठी अडचण झाली आहे. ही अडचण पाहता नांदेड महापालिकेच्या यशस्वी निकालानंतर हैदराबाद येथील एमआयएम हा राजकीय पक्ष आता अकोल्यात उतरणार असल्याची माहिती मिळाली. यापूर्वी येथे आसाम येथील युडिएफ या पक्षानेही चाचपणी सुरू केली आहे, हे विशेष.
एका राष्ट्रीय पक्षात नेतृत्व गुणांची कुचंबणा होत असल्याचे लक्षात आल्यावर येथील एका मुस्लिम नेत्याने नुकतीच हैदराबाद येथे एमआयएमचे अध्यक्ष असाउद्दीन यांची भेट घेऊन अकोल्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा केली. अकोल्यातील या राष्ट्रीय पक्षातील नेत्याने थेट एमआयएम अकोल्यात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
या प्रयत्नात या नेत्याला यश मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही वर्षांंपासून केवळ मुस्लिम मतांच्या जोरावर राजकारण करणाऱ्या येथील स्थानिक नेत्यांना यामुळे चांगलीच चपराक यानिमित्ताने बसेल. एमआयएम येथे आल्यास अकोल्यातील राजकीय समीकरणात मोठे बदल येत्या काळात संभवतात. या पक्षाचे आंध्रप्रदेशात सात आमदार असून हैदराबाद महानगरपालिकेतही चांगलेच प्रतिनिधित्व आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या नांदेड महापालिका निवडणुकीत या पक्षाने अकरा जागा िंजंकू न पक्षाचे पाय महाराष्ट्रात रोवले. नांदेड महापालिका निवडणुकीत यशस्वी पर्दापण झाल्यानंतर राज्यातील मुस्लिमबहुल जिल्ह्य़ात एमआयएमचे आगमन होताना दिसत आहे. त्यामुळे इतर राजकीय पक्षांसाठी ही मोठी डोकेदुखी भविष्यात ठरू शकते. येत्या काळात अकोल्यातील राजकारणात याचा मोठा फरक पडेल, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले.
अकोल्यातील राजकीय आखाडय़ात एमआयएम येणार
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व युडिएफ यांना टक्कर देण्यासाठी महाराष्ट्रात नांदेडनंतर अकोल्यात ऑल इंडिया मल्लीस ए इत्तेहादूल मुसलमीन अर्थात, एमआयएम आपले पावले टाकणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
First published on: 03-01-2013 at 02:57 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mim will come in akola politics