पनवेलमध्ये नगरपालिकेची हक्काची बस फिरणार असली तरी ही बस अरुंद रस्त्यांवरून कशी धावणार, असा प्रश्न नगरपालिकेतील अधिकाऱ्यांना पडला आहे. शहरातील अरुंद रस्त्यांवरून बस फिरल्यास सामान्यांना पदपथाचा आधार घ्यावा लागेल, मात्र त्याची मालकी रस्त्याकडेला असणारे दुकानवाले आणि काही वाचनालयांकडे असल्याने पदपथावर चालायचे कसे, हा यक्षप्रश्न नागरिकांपुढे उभा आहे.
पनवेल हे वाचनसंस्कृतीचे जतन करणारे शहर आहे. मात्र हीच वाचनसंस्कृती काही नगरसेवकांनी हक्काची करून घेत, थेट रस्ता अडविण्याचे काम केले आहे. पनवेलची वाचन चळवळ सुरू ठेवणारी ग्रंथालये ही शहराची ओळख आहे.
मात्र कमी खर्चात प्रसिद्धीसोबत वाट अडवून रस्त्याकडेला वर्तमानपत्र वाचनासाठी उभारलेली वाचनालय संस्कृती शहरात मोठय़ा प्रमाणात रुजलेली दिसत आहे. काही नगरसेवकांनी ही चळवळ उभारल्याने नगरपालिकेतील अतिक्रमणविरोधी पथकाने हातावर हात ठेवत सावध पवित्रा घेतला आहे. मुळात शहरातील फेरीवाल्यांचे साम्राज्य पाहता नगरपालिकेत हा विभाग आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होतो. शहरातील वाहतुकीची समस्या सुटण्यासाठी नगरपालिकेने बसचा उतारा आणला आहे. प्रवाशांची सोय असलेल्या मिनीबस शहरात चालताना फुटपाथ मोकळे करणे ही पालिकेसमोर मोठी अडचण ठरणार आहे.
याबाबत पनवेल नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सुधाकर जगताप यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, शहरातून बस चालताना सामान्य नागरिकांना फुटपाथवरून चालावे लागले, मात्र काही ठिकाणी अडचणी आल्यास अतिक्रमणविरोधी पथकाच्या माध्यमातून मोहीम राबवून अतिक्रमण हटविण्यात येईल. फुटपाथ नक्कीच मोकळे केले जातील, असे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minibus in panvel
Show comments