टोलविरोधी आंदोलनात कामगार मंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आपण जनतेच्या बाजूने आहोत हे दाखवून द्यावे. त्यासाठी सोमवारी निघणाऱ्या विराट मोर्चामध्ये सहभागी होऊन आपण जनतेच्या सोबत आहोत हे सिध्द करून दाखवावे, असे आवाहन करणारे निवेदन टोलविरोधी कृतीसमितीच्यावतीने उभय मंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी शहरात टोलची आकारणी होणार असे ठामपणे सांगितले होते. या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ातील दोन्ही मंत्र्यांची भूमिका काय राहणार याकडे लक्ष वेधले आहे.
शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या टोल आकारणीविरूध्द जनआंदोलन तापत चालले आहे. टोलविरोधी कृतीसमितीने ८ जुलै रोजी महामोर्चा काढण्याची घोषणा केली असून त्याची तयारीही सुरू आहे. तथापि मुख्यमंत्र्यांच्या टोल आकारणीच्या विधानामुळे पुन्हा एकदा चलबिचल झाली आहे. तरीही कृती समितीने आपले आंदोलन ताकदीने पुढे रेटण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात जिल्ह्य़ातील मंत्र्यांनाही सहभागी करून घेण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली आहे.याबाबत टोलविरोधी कृती समितीच्यावतीने मुश्रीफ व पाटील या मंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.यामध्ये म्हटले आहे की राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, कामगारमंत्री मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची कृती समितीने भेट घेतली होती. टोलला पर्याय म्हणून कृतीसमितीने चार मुद्दे सुचविले होते. तेंव्हा मंत्र्यांनी याप्रश्नी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले होते. त्यामुळे दोंन्ही मंत्र्यांनी या दिशेने काय प्रयत्न केले हे अद्याप समजू शकले नाही. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे.
तसेच, मुश्रीफ व पाटील या मंत्र्यांकडे जिल्ह्य़ाच्या पालकत्वाची जबाबदारी आहे. जनतेच्या प्रश्नामध्ये सहभागी होण्याचे विधान त्यांनी केले आहे. या विधानाची प्रचिती येण्यासाठी त्यांनी सोमवारी निघणाऱ्या विराट मोर्चामध्ये सहभागी होण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या या कृतीने कोल्हापुरातील तीन पिढय़ांना टोल आकारणीचा होणारा त्रास नष्ट होणार आहे. आयआरबी कंपनी शहरातून कायमची हद्दपार होणार आहे.याबाबी लक्षात घेता मंत्र्यांनी आंदोलनाला पाठबळ द्यावे, असे आवाहन कृती समितीने केले आहे.
दरम्यान, कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक यशवंत कडगे यांना एक निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, टोल विरोधातील मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करणारा फलक कावळा नाका येथे लावण्यात आला होता. त्यावर कृती समितीच्या महिला कार्यकर्त्यांची छायाचित्रे होती. तथापि आंदोलनात फूट पाडणाऱ्या प्रवृत्तीने या फलकाची नासधूस केली आहे. अशाप्रकारचा भ्याड हल्ला करणाऱ्या लोकांना पकडून त्यांचा चेहरा उघडकीस आणावा, अशी मागणी त्यामध्ये केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा