टोलमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने जाणारे पहिले पाऊल टाकत महायुतीच्या वतीने मंगळवारी कोल्हापूर टोलमुक्त करावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. या वेळी मोर्चाचे नेतृत्व करणारे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार विनोद तावडे यांनी, कोल्हापूर टोलमुक्त करण्याची फसवी घोषणा कामगारमंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे. जिल्ह्य़ातील दोंन्ही मंत्र्यांनी आपली मालमत्ता विकून आयआरबीची किंमत चुकवावी. त्याचा भार महापालिकेवर टाकू नये, अशी मागणी केली.    
शहरात आयआरबी कंपनीने सुरू केलेल्या टोल आकारणीच्या विरोधात सर्वपक्षीय टोलविरोधी कृतीसमितीने गेल्या तीन वर्षांपासून आंदोलन चालविले आहे. तथापी, गेल्या कांही दिवसांपासून महायुतीने टोलविरोधी आंदोलनात सवतासुभा मांडला आहे. टोलविरोधातील भावनांना वाट करून देऊन मतांचे राजकारण करण्याचा यामागे प्रयत्न आहे. त्यामुळेच आजचा टोलविरोधातील मोर्चा जोरदार व्हावा, यासाठी गेल्या आठवडय़ाभरापासून प्रयत्न सुरू होते. परिणामी आजच्या मोर्चात महायुतीचे कार्यकर्ते लक्षणीय संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा महायुतीचा असला तरी शिवसेनेचा भगवा व रिपाइचा निळा झेंडा ठळकपणे डौलताना दिसत होता.    
गांधी मैदानापासून मोर्चाला सुरूवात झाली. खरी कॉर्नर, महाद्वार चौक, महापालिका, महाराणा प्रतापचौक, व्हिनस कॉर्नर, बसंत-बहार चित्रमंदिरमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. मोर्चात लक्षवेधी ठरण्याच्यादृष्टीने आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी तीन गाढवे आणली होती. त्यांच्या तोंडाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिमा लावली होती. तर अंगावर टोल देणार नाही या मागणीची झूल पांघरली होती. शिवसेनेने टोलरूपी रावणाचा वध करणाऱ्या शिवाजी महाराजांचा जिवंत देखावा साकारला होता. ‘देणार नाही देणार नाही, टोल आम्ही देणार नाही’, ‘टोलमुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशा घोषणा देत कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.
या वेळी शिवसेना संपर्क नेते आमदार दिवाकर रावते, शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांची भाषणे झाली. या वेळी आमदार चंद्रकांत पाटील, आमदार सुजित मिणचेकर, आमदार सुरेश हाळवणकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, भाजपाचे शहराध्यक्ष महेश जाधव, प्रा.शहाजी कांबळे उपस्थित होते.