तालुक्याच्या सरकारी कार्यालयात कारकुनाच्या टेबलपासून थेट मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत स्वत: संचिका घेऊन काम करूनच घेण्याची हातोटी, सरकारी योजना खेचून आणताना ‘कार्यकर्त्यांना सांभाळणारा’ आणि लोकांची नस ओळखणारा आमदार अशी ओळख असलेले सुरेश धस आपल्या ‘धस’ मुसळेपणामुळे कायम वादग्रस्त ठरले. मंत्रिपदी वर्णी लागण्याच्या काही दिवस आधी पाटोदा येथील बँकेतगोंधळ घातल्याप्रकरणी त्यांना अटक झाली होती. पक्ष कोणताही असो, नेत्यांच्या जवळचा माणूस म्हणूनच त्यांचा वावर राहिला आहे.
पण त्यांचा ‘धस’ मुसळेपणा काही आजचा नाही. काही वर्षांपूर्वी मतदारसंघातील कामासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी नंदकुमार जंत्रे यांच्या विरोधात धस यांनी आत्मदहनाचा इशारा दिला. सरकारी योजनेचा अध्यादेश स्थानिक परिस्थितीनुसार मंत्रालयातून बदलून आणण्याची ताकद ते ठेवतात. तालुका स्तरावरील सरकारी कार्यालयात कारकुनाच्या टेबलावर जाऊन ते काम सांगतात, तर मंत्रालयात कार्यकर्त्यांसमवेत अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन ठाण मांडून बसतात. त्यामुळे मनासारखे काम झाले नाही की अधिकाऱ्यांशी खटकेही उडतात.
काही महिन्यांपूर्वीच धस यांनी मंत्रालयात एका वरिष्ठ अधिकाऱ्याबरोबर वाद घातला, तर जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांची बदली व्हावी, यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. चारा छावण्या, तलावातील गाळ काढणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा, महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या कामावरून निर्माण झालेले वाद सर्वानाच माहीत आहेत. जिल्हाधिकारी केंद्रेकर यांचा कारभार पारदर्शक मानला जातो. मात्र, आष्टी मतदारसंघातील कामावरून धस व केंद्रेकर यांच्यात मतभेद झाले. त्यांनी केंद्रेकर यांच्यावर काही आरोपही केले. पैसेवारी चुकीच्या पद्धतीने काढल्याचा आरोप केल्याने ते वादग्रस्त ठरले होते.
मतदारसंघातील शेतकऱ्यांना गाळ काढण्यास कर्ज दिले जात नाही, या कारणावरून मागील महिन्यात त्यांनी पाटोदा येथील स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखेत वाद घातला. त्यातून बँकेची तोडफोड व अधिकाऱ्यांना मारहाण झाली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर दोन दिवसांची त्यांना तुरुंगवारीही घडली.
कोणतीही राजकीय पाश्र्वभूमी नसताना धस यांनी राजकारणातील एकेक टप्पा पार करीत आपले नेतृत्व विकसित केले. माजी आमदार साहेबराव दरेकर यांच्या गटाकडून जिल्हा परिषदेत निवडून आलेले धस युतीच्या काळात जि. प. त उपाध्यक्ष झाले. तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी आपले बंधू पंडितराव मुंडे यांना अध्यक्ष करण्यासाठी राजकीय तडजोड केली. त्यात धस यांना संधी मिळाली. संधी मिळताच धस यांनी मुंडे यांचा विश्वास संपादन केला आणि १९९९ व २००४ च्या निवडणुकांत भाजपच्या उमेदवारीवर विजय मिळवला. मतदारसंघात गावागावांत संपर्क ठेवणारा, अस्सल ग्रामीण भाषेत संवाद साधत जनतेची नाळ ओळखून काम करणारा आमदार अशी त्यांची ओळख झाली. काम वैयक्तिक अथवा सार्वजनिक, सरकारी कार्यालयात कार्यकर्त्यांसोबत जाऊन काम करून घेण्याच्या पद्धतीमुळे ते लोकप्रिय झाले.
राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या धस यांनी भाजपची सत्ता येत नाही, हे लक्षात येताच राष्ट्रवादीशी जुळवून प्रवेश केला आणि अजित पवार यांचे खास म्हणून त्यांचा वावर सुरू  झाला. मात्र, ‘धस’ मुसळेपणाच्या वृत्तीमुळे ते कायम वादग्रस्त राहिले आहेत.

Story img Loader