शिर्डी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने यापूर्वी कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार दिलेला नाही, अथवा राष्ट्रवादीने देखील शिवसेनेला कधी राजकीय मदत केलेली नाही, असा खुलासा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी आज एका पत्रकाद्वारे केला आहे. तसेच मंत्री विखे यांनी शिवसेनेच्या कुरापती काढण्यापेक्षा पदाचा वापर जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी करावा असे आवाहनही त्यांनी केले.  
कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी पत्रकारांशी बोलताना शिर्डी विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला शिवसेनेने पुरस्कृत केले होते. याही निवडणुकीत असेच असेल तर त्यात नवीन काय आहे, असे वक्तव्य केले होते. त्याला खेवरे यांनी आज उत्तर दिले आहे. पत्रकात त्यांनी म्हटले आहे, की जनतेची विकासकामे व्हावी या अपेक्षेने जनतेने मंत्री विखे यांना पाच वेळेस निवडून दिले. परंतु त्यांच्याकडून रस्ते, निळवंडेचे कालवे, पाटपाण्याचे प्रश्न सुटले नाहीत. त्यामुळे मागील निवडणुकीत जनतेने त्यांचे मताधिक्य कमी केले. प्रामाणिक राजकीय पक्ष असणाऱ्या शिवसेनेने विखे पिता-पुत्रांना केंद्र व राज्यात मंत्रिपदे देऊन त्यांचा सन्मान केला. तिकीट वाटपात शिवसेना कधीही पैसे घेत नाही. जर पैसे घेत असतील तर तसे मंत्री विखे यांनी जाहीर करावे.
आगामी निवडणुकांमध्ये प्रथम लोकसभेची निवडणूक व नंतर विधानसभेची निवडणूक होणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील तो सर्व शिवसैनिकांना मान्य असेल. त्याच्या विजयासाठी शिवसैनिक एकदिलाने व प्रामाणिकपणे काम करतील. मंत्री विखे यांनी सर्व गोष्टीवर स्पष्टीकरण न दिल्यास आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. विखेंनी सत्ता मिळविण्यासाठी अनेक राजकीय पक्षांत कोलांटउडय़ा मारल्या आहेत. हे जनतेला माहीत असल्याने त्यांना या विषयावर भाष्य करण्याचा अधिकार नाही असेही खेवरे यांनी पत्रकात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा