अजमेर-बेंगलोर एक्स्प्रेसमध्ये मंगळवारी सकाळी आकस्मिक आग लागली.  मात्र प्रवाशांच्या दक्षतेने पुढील अनर्थ टळला.  एक्स्प्रेसमधील वातानुकूलित डब्यामध्ये ही दुर्घटना घडली.  या घटनेची उच्चस्तरीय चौकशी रेल्वे विभागाकडून करण्यात येत आहे.
अजमेर-बेंगलोर एक्स्प्रेस आज पहाटे ४.३० वाजता पुणे स्थानकावरुन मिरजेकडे रवाना झाली. दीड तासानंतर सकाळी ६ वाजता दौंडज-वाल्हा स्थानकादरम्यान वातानुकूलित बोगी नं.३ मध्ये एका महिला प्रवाशाला आसन क्र.५५ वर धूर येत असल्याचे लक्षात आले.  महिलेने आरडा-ओरडा करताच धावत्या रेल्वेची चेन ओढण्यात आली. वातानुकूलित डब्यातील साहाय्यकाने घटनास्थळी येऊन चौकशी करताच बर्थवरील ब्लँकेट मधून धूर येत असल्याचे लक्षात आले. तत्काळ पाणी मारुन आग विझविण्यात आली.
या बर्थवरील प्रवासी अजमेरहून पुण्यापर्यंत प्रवास करणारा असल्याचे आरक्षण यादीवरुन स्पष्ट झाले आहे. पुण्यात पहाटे ४.३० वाजता तो उतरुन गेल्यानंतर दीड तासाने ही घटना उघडकीस आली.  रेल्वे मिरज स्थानकावर आल्यानंतर कर्मचारी व रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी पुन्हा तपासणी केली.  या घटनेमुळे रेल्वेच्या पुढील प्रवासास अर्धातास विलंब झाला. या दुर्घटनेची तज्ञांमार्फत चौकशी करण्यात येत असल्याचे स्थानक अधीक्षक मोहनशंकर मसुद यांनी सांगितले.

Story img Loader