भरपूर पैसे देण्याचे अमिष दाखवून रोजगाराच्या कारणाने धुळ्यात आणलेल्या अल्पवयीन मुलीकडून देहविक्री करवून घेणाऱ्या दलाल महिलेसह या प्रकरणातील संशयितांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, या मागणीने जोर धरला आहे. ज्या संशयितांना न्यायालयाने जामीन मंजूर केला, त्यांचा जामीन रद्द व्हावा, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पीडित मुलीचे वडील रावसाहेब मुंगसे (रा. नांदूर शिंगोटे, नाशिक) यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. या प्रकरणातील एक संशयित संजय बोरसेने आत्महत्या केली. मृत बोरसेची पत्नी मंगलाबाई यांनी दिलेल्या फिर्यादीत पीडित मुलीचे वडील रावसाहेब मुंगसे यांनी ३० हजारात त्यांच्या मुलीला बेबीताईकडे विकल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या प्रकरणात अल्पवयीन पिडीत मुलीचे लैंगिक शोषण करणारे तसेच तिला देहविक्रीला भाग पाडणाऱ्या सर्वावरच कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आंदोलनाद्वारे याच मुद्याकडे लक्ष वेधण्यात आले होते.
पिडीत बालिकेवर अत्याचार करणाऱ्यांमध्ये पत्रकार, प्रतिष्ठित म्हणविले जाणारे नागरीक व काही व्यापाऱ्यांचाही समावेश असल्याचा आरोप आहे. ज्या ठिकाणी पीडित मुलीला डांबण्यात आले होते, त्या बेबीताई चौधरीसह तिचा मुलगा गणेश तसेच सपना पाटील, पूजा पाटील व पूजा कातकडे यांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. यातील संशयित सचिन अग्रवाल, अशोक बाफना आणि विजय टाटीया यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी तो
रद्द करावा, अशा मागणीने जोर
धरला आहे.
या खटल्यासाठी गृह विभागाने येथील अॅड. निर्मलकुमार सूर्यवंशी यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली आहे. या शिवाय, औरंगाबाद खंडपीठ आणि दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयातही या प्रकरणाचे कामकाज चालविले जावू शकेल. धुळ्यात उघडकीस आलेल्या या प्रकरणाची र्सवकष चौकशी होऊन दोषींना कठोर शासन करावे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा