राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षांचा गोंधळ सुटता सुटत नसून डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात अभियांत्रिकी आणि विधिच्या परीक्षांचे सूतोवाच करून त्याच्या दूरगामी परिणामांकडे विद्यापीठ प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. विद्यार्थ्यांच्या समस्येवर तोडगा काढला या आविर्भावात आज कुलसचिवांनी पत्रकार परिषद घेतली मात्र, परीक्षेसंबंधीच्या अनेक बाबींची त्यांना माहिती नव्हती. अभियांत्रिकीच्या किंवा विधिच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या अशा विद्यार्थ्यांची आकडेवारी कुलसचिव देऊ शकले नाहीत. फेरमूल्यांकन किती विद्यार्थ्यांचे झाले, त्यात किती विद्यार्थी पात्र ठरले, किती अनुत्तीर्ण झाले अशी कोणतीही माहिती कुलसचिव देऊ शकलेले नाहीत.
गेल्या चार दिवसांपासून अभियांत्रिकी, विधि आणि एमबीएच्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या नेत्यांचा विद्यापीठावर दबाव असून पोलीस संरक्षणात गेल्या पाच दिवसांपासून विद्यापीठाचे कामकाज सुरू आहे. आज सकाळी विद्वत परीक्षेच्या बैठकीत प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यात जे विद्यार्थी फेरमूल्यांकनात पात्र ठरले त्यांनी येत्या १७ नोव्हेंबपर्यंत प्रवेश घ्यायचे असून त्यानंतर १५ दिवसांच आत परीक्षा अर्ज भरण्याचा निर्णय आजच्या विद्वत परिषदेने घेतला आहे. मात्र विद्यार्थ्यांला परीक्षेला बसू द्यायचे किंवा नाही, हे त्या त्या महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा विभाग प्रमुखच ठरवणार आहेत. त्यात अभियांत्रिकीच्या परीक्षा डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात होणार आहेत.
विधि विद्याशाखेच्या अभ्यासक्रमांचा अंतर्गत गोंधळ खूपच असून त्यात २००३-०४ पासून ८० गुणांची लेखी तर २० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा होती. त्यानंतर २००९-१०मध्ये नवीन १०० गुणांची लेखी परीक्षा झाली. पुन्हा २०११-१२मध्ये ८० गुणांची लेखी तर २० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा करण्यात आली मात्र, यावेळी क्रेडिट सिस्टम लागू करण्यात आली. त्यामुळेच नवीन अभ्यासक्रम आणि जुना अभ्यासक्रमांच्या आणि अनुत्तीर्ण पेपरच्या परीक्षांची संख्या फार होत असल्याने विद्यार्थ्यांनी अतिरिक्त परीक्षा नाकारल्या आणि विद्यापीठावर मोर्चे आणणे सुरू केले. आता जुन्या अभ्यासक्रमाची परीक्षा देणाऱ्या विधिच्या विद्यार्थ्यांना तीन संधी देण्यात येतील, असा निर्णय आजच्या विद्वत परिषदेत झाल्याचे कुलसचिव डॉ. अशोक गोमासे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी विद्यापीठावर मोर्चे आणून प्रवेश आणि परीक्षा अर्ज भरण्याचे इप्सित साध्य केले मात्र, याच्या दूरगामी परिणामांचा विचार केलेलाच दिसत नाही. कारण, डिसेंबरच्या शेवटी होणाऱ्या परीक्षा या जानेवारीच्या शेवटपर्यंत चालतील. त्यानंतर मूल्यांकन आणि फेरमूल्यांकन होईल. तेव्हा याहीपेक्षा भयानक स्थिती उद्भवू शकेल. आजच्या पत्रकार परिषदेत स्वत: अशोक गोमासे यांनी कबूल केले की, तीन वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचे मोर्चे विद्यापीठावर विद्यार्थ्यांनी आणले. यात फेरमूल्यांकनाचे निकाल उशिरा लागल्याने परीक्षा अर्ज भरण्याची संधी मिळावी यासाठी अभियांत्रिकी आणि इतर काही विषयांच्या मागण्या घेऊन आलेला मोर्चा होता. दुसरा मोर्चा गेल्या सोमवारी, म्हणजे ५ नोव्हेंबरला परीक्षेच्या वेळापत्रकानुसार परीक्षा देण्यास आलेल्या विद्यार्थ्यांचा तर तिसरा मोर्चा विधि विद्याशाखेच्या विविध सत्रांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या आणि इतर काही अडचणींना बरोबर घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांचा होता. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सोमवारपासून नियमितपणे सुरू होणार होत्या, असे ९८ टक्के म्हणजे लाखो विद्यार्थी आहेत तर विद्यापीठावर मोर्चा घेऊन आलेल्या अभियांत्रिकी आणि विधिच्या विद्यार्थी काही दोन टक्के म्हणजे शे-दीडशे असल्याचे कुलसचिवांनी कबूल केले आहे. मात्र, या सर्व बाबींचा विद्यापीठाच्या विद्वत परिषदेत कणखरपणे विचारच झालेला दिसून येत नाही.
आजच्या विद्वत परिषदेत एमटेकच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर नवीन अभ्यासक्रमांना शैक्षणिक सत्राच्या मधेच मान्यता देण्यात आल्याने पत्रकारांनी प्रशासनाला धारेवर धरले. जो अभ्यासक्रम अस्तित्वातच नाही त्याची मान्यता विद्वत परिषदेत तातडीने घेण्याचे औचित्य नव्हते. शिवाय कोणत्या महाविद्यालयांनी नवीन अभ्यासक्रमाची मागणी केली, याची माहिती देण्यास कुलसचिव आणि विद्यापीठ अधिकारी टाळाटाळ करीत होते.