नाशिक विमानतळाचा उद्घाटन सोहळा ओझर येथे दिमाखदारपणे पार पडला असला तरी या वेळी झालेली फटाक्यांची आतषबाजी लढाऊ विमानांची बांधणी करणाऱ्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) परिसरातील गवताला आग लागण्यास कारक ठरली. पेटता फटाका पडल्याने एका भागातील गवताने पेट घेतला. त्याची खबर मिळाल्यावर या आगीचे गांभीर्य ओळखून एचएएलच्या अग्निशमन विभागाने तातडीने बंब रवाना करीत आगीवर नियंत्रण मिळविल्याने अनर्थ टळला. संरक्षण विभागाच्या अखत्यारितील या अतिशय संवेदनशील परिसरात विमानतळाचे उद्घाटन फटाक्यांच्या आतषबाजीने केले जाणार असल्याबाबत खुद्द एचएएल व्यवस्थापन अनभिज्ञ होते. या स्वरूपाची आतषबाजी करण्याकरिता कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आली नसल्याचे त्यामुळे उघड झाले आहे. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नाशिक विमानतळाचे दिमाखात उद्घाटन करण्याचा हा प्रयत्न संरक्षण विभागाच्या अखत्यारितील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल, पालकमंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि एचएएलचे व्यवस्थापकीय संचालक एस. सुब्रह्मण्यम् यांच्या साक्षीने हा सोहळा पार पडला. काही महिन्यांपूर्वी शहरातील उड्डाणपुलाचे उद्घाटन करताना आतषबाजीसाठी जे तंत्र वापरले गेले, तसेच किंबहुना त्याहून अधिक विलोभनीय पद्धतीने हा सोहळा करण्याचा प्रयत्न झाला, परंतु शहरी भागातील आसमंतात फटाक्यांची आतषबाजी करणे वेगळे आणि लढाऊ विमानांची बांधणी होणाऱ्या कारखाना परिसरात करणे वेगळे, ही बाब लक्षात घेतली गेली नाही. नेत्रदीपक आतषबाजी करण्यासाठी खास बॉलीवूडमधील तंत्रज्ञांना आवतण देण्यात आले होते. साधारणत: अर्धा तास चाललेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले खरे, मात्र त्याच सुमारास प्रवासी इमारत आणि कार्गो यादरम्यानच्या भागातील गवताला आग लागली. ही बाब निदर्शनास आल्यावर एचएएलच्या अधिकाऱ्यांनी त्वरित कारखान्यातील अग्निशमन विभागास सूचित केले. कारखान्यातील अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी काही वेळात आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेत काही भागांतील गवत जळाल्याची माहिती एचएएलच्या अग्निशमन विभागाने दिली. एचएएल कारखान्याच्या विस्तीर्ण परिसरात सुखोई लढाऊ विमानांची बांधणी, मिग २७ आणि अन्य लढाऊ विमानांच्या दुरुस्तीचे काम केले जाते. एकूण एक लाख ७३ हजार चौरस मीटरमध्ये पसरलेल्या वेगवेगळ्या दालनांमध्ये हे काम अव्याहतपणे सुरू असते. ही दालने वगळता उर्वरित संपूर्ण परिसर गवताळ असून या ठिकाणी किंचितसा निष्काळजीपणाही धोकादायक ठरू शकतो. संरक्षण दलाच्या अखत्यारितील जमिनीवरील प्रवासी इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात फटाक्यांची आतषबाजी होईल, याबद्दल खुद्द एचएएल व्यवस्थापन अंधारात होते. एचएएलच्या अग्निशमन विभागाने त्यास दुजोरा दिला. उद्घाटन सोहळ्यात आतषबाजी करण्यासाठी संयोजकांनी कोणतीही पूर्वपरवानगी मागितली नसल्याचे एचएएलच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले. आतषबाजीप्रसंगी एचएएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते हे विशेष. कोणतीही परवानगी न घेता एचएएल कारखान्याच्या परिसरात या पद्धतीने फटाक्यांची आतषबाजी करणे गंभीर असल्याचे मत एचएएल लिमिटेड (नाशिक विभाग) कर्मचारी संघटनेचे माजी उपाध्यक्ष अशोक जाधव यांनी व्यक्त केले आहे.
‘नाशिक विमानतळाभोवतीचा परिसर संवेदनशील’
आगीच्या दुर्घटनेचे स्वरूप मोठे नसले तरी ज्या ठिकाणी हा प्रकार घडला, तेथून काही अंतरावर लढाऊ विमानांचा ‘हँगर’ व नियंत्रण कक्ष आहे. या दोन्ही ठिकाणी काही लढाऊ विमाने सदैव थांबलेली असतात. इतकेच नव्हे तर, विमानांसाठी लागणाऱ्या इंधनाचा साठा करण्याची व्यवस्था याच परिसरात आहे. या ठिकाणी ‘एव्हिएशन फ्लुएल’ घेऊन आलेले टँकरही असतात.