दोन नक्षल समर्थक कैदी पळून गेल्याने जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील गलथान कारभार चव्हाटय़ावर आला आहे. कारागृह अधीक्षक आर्थिक लाभाच्या मोबदल्यात कैद्यांना मोबाईल, चरस, गांजा, पान, विडी, तंबाखू यासह घरचे जेवण पुरविणे, नातेवाईकांच्या भेटी घडवून आणणे, कारागृहाच्या आत अतिविशिष्ट सेवा उपलब्ध करून देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातूनच कडक सुरक्षा असतानाही दोन कैदी पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कस्तुरबा गांधी चौकात जिल्हा कारागृह आहे. तीनशे कैद्यांची क्षमता असलेल्या या कारागृहात सध्या विविध गुन्हय़ात शिक्षा भोगत असलेले ४५२ कैदी आहेत. यात लगतच्या गडचिरोली जिल्हय़ातील नक्षल कैद्यांसोबत हत्या, चोरी, दरोडा व इतर गुन्हय़ांतील कैद्यांसोबतच काही ‘मोस्ट वॉन्टेड’ गुन्हेगार कारागृहात शिक्षा भोगत आहेत. नक्षल कैद्यांमुळे येथे कडक सुरक्षा व्यवस्था असली तरी कारागृह अधीक्षकाचे पद रिक्त असल्याने सर्व गलथान कारभार सुरू आहे. गेल्या ३१ मार्च रोजी कारागृह अधीक्षक टिकले सेवानिवृत्त झाल्यापासून अधीक्षकाचा प्रभार सचिन साळवी यांच्याकडे आहे. मात्र त्यांच्याच कार्यकाळात हा सर्व गैरव्यवहार सुरू झाल्याची माहिती कारागृहातील सूत्रांनी दिली. पंधरा दिवसांपूर्वीच कारागृहातील कैद्याजवळ मोबाईल मिळाला. यासोबतच कैद्यांजवळ गांजा, चरस, विडी, पान, खर्रा मिळाला. कैद्यांना या सर्व सुविधा आर्थिक लाभाच्या मोबदल्यात मिळतात. केवळ या सुविधाच नाही तर काही कैद्यांना अतिविशिष्ट सेवासुध्दा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. घुग्घुस हत्याकांडातील मुख्य आरोपी हाजी सरवर व त्याच्या सहकाऱ्यांना सुध्दा कारागृहात अशाच पध्दतीने अतिविशिष्ट सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र मध्यंतरी पोलीस अधीक्षकांनी कारागृहाला भेट दिली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे हाजी सरवर याला नागपूरच्या कारागृहात हलविण्यात आले. त्याच वेळी हाजीने पैसे देऊनही सुविधा उपलब्ध करून दिली नाही, उलट नागपूरला स्थलांतरीत करीत आहे, असे म्हणून साळवी यांना कारागृहाच्या मुख्य प्रवेशव्दारावर धमकी दिली होती. केवळ हा एकच प्रकार नाही तर कारागृहातील काही व्हीआयपी कैद्यांना घरचे जेवणसुध्दा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कैद्यांना पान व खर्रा उपलब्ध करून देण्यासाठी दोन पोलीस शिपाई आहेत. काही कैद्यांना कारागृहात घरच्या सारखी सेवा मिळत आहे. या सर्व प्रकारामुळे कारागृहातील सुरक्षा खिळखिळी झाली आहे. नेमका याचाच फायदा घेत कारागृहातील मुख्य तटरक्षक भिंत भेदून लंकेश मट्टामी व नरेश कुमरे हे दोन नक्षल समर्थक कैदी पळून गेल्याचे सूत्रांनी सांगितले.
या दोन कैद्यांचा वावर कारागृहात अतिशय संशयास्पद होता. मात्र त्याकडे कारागृह अधीक्षकाचे पूर्णत: दुर्लक्ष झाले होते. या दुर्लक्षातूनच यापूर्वी एका कैद्याने कारागृहात आत्महत्या केली होती. एका कैद्याला जिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी नेले असता तिथून पळ काढला होता. तसेच काही कैद्यांनी मध्यंतरी कारागृह व्यवस्थापनाच्या विरोधात आवाज उठवून उपोषण सुरू केले होते. मात्र वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर कैद्यांनी उपोषण मागे घेतले होते. क्षमतेपेक्षा अधिक कैदी वास्तव्याला असल्याने कारागृहाला अनेक समस्या भेडसावत आहेत. महिला कैद्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था असतानाही महिला कैद्यांसोबत असभ्य वागणुकीच्या अनेक तक्रारी आहेत. एकूणच कैदी पळून गेल्याच्या घटनेनंतर कारागृहातील सर्व गैरव्यवहार चव्हाटय़ावर येत आहेत. गेल्या वर्षीच्या पावसाळय़ात मुख्य तटरक्षक भिंत कोसळल्यानंतरही ती बांधण्यात आली नाही. त्याच भिंतीवरून या कैद्यांनी पळ काढला. यासोबतच कारागृहाच्या आजूबाजूला असलेल्या मोठय़ा इमारतीही सुरक्षेत मुख्य अडसर ठरल्या आहेत. मागच्या बाजूची सोमेश्वर मंदिराची इमारत सुध्दा धोकादायक आहे. दरम्यान,या फरार कैद्यांचा शोध अजूनही लागला नसून शहर व रामनगर पोलीस या कैद्यांचा कसून शोध घेत आहेत.
कारागृह उपमहानिरीक्षकांची भेट
दोन नक्षल समर्थक कैदी भर दुपारी पळून गेल्यानंतर कारागृह विभागाचे उपमहानिरीक्षक व्ही.व्ही. शेकदार यांनी आज जिल्हा मध्यवर्ती कारागृहाला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रभारी कारागृह अधीक्षक सचिन साळवी व त्यांच्या इतर सहकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. भर दुपारी दोन कैदी सुरक्षा भेदून पळून कसे जातात? असे म्हणून चांगलेच पैलावर घेतले. यावेळी त्यांनी संपूर्ण कारागृहाची पाहणी करीत पडलेली भिंत अजून का बांधली नाही तसेच कारागृहात चालणाऱ्या सर्व गैरकृत्याचा पाढाच वाचून दाखविला. यावेळी कैद्यांसोबत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बयान नोंदविण्यात आले आहे.