कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
होळीच्या वेळी पाण्याचा वापर करू नका, कोरडय़ा रंगांचा वापर करा म्हणून नागरिकांना जनजागृतीसाठी पत्रके वाटप करणाऱ्या आम आदमीच्या कार्यकर्त्यांना मंगळवारी संध्याकाळी डोंबिवलीतील घरडा सर्कल येथे चोळे, आजदे गावातील तेरा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. कार्यकर्त्यांमधील तरुणींना मारहाण करून एकीचा विनयभंग केला असल्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याप्रकरणी आकाश शेळके, किरण सोनने यांना अटक करण्यात आली आहे. आम आदमीचे कार्यकर्ते प्रशांत रेडीज व इतर मंगळवारी संध्याकाळी होळीच्या काळात पाणी वापरू नका, नैसर्गिक रंगांचा वापर करा म्हणून घरडा सर्कल येथे पत्रके वाटप करीत होते. बाजूला उभ्या असलेल्या तेरा जणांच्या टोळक्याने आम आदमीच्या कार्यकर्त्यांवर रंगांचे फुगे फेकून त्यांची टिंगलटवाळी सुरू केली.
कार्यकर्त्यांमधील दोन तरुणींना या टोळक्याने लक्ष करून त्यांच्यावर फुग्यांचा सर्वाधिक मारा केला. आम आदमीच्या कार्यकर्त्यांनी या टोळक्याला शांत राहण्यास सांगितले. मात्र तरीही त्यांनी ऐकले नाही.  एका तरुणीचा त्यांनी विनयभंगही केला. मानपाडा पोलीस घटनास्थळी आल्यानंतर एका गावगुंडाला पकडण्यात आले. त्याने इतर तेरा जणांची नावे पोलिसांना दिली आहेत. त्यांना अटक करण्याचे काम सुरू आहे. जमाव जमवणे, हुल्लड करणे, विनयभंग असे गुन्हे आरोपींविरुद्ध दाखल करण्यात आले आहेत.

Story img Loader