डोंबिवली पूर्वेतील एका प्रसिद्ध शाळेतील विद्यार्थिनीला अश्लील लघुसंदेश, चित्रफिती पाठवून तिचा विनयभंग करणाऱ्या चार तरुणांविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गेल्या महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करून १२ दिवस उलटले तरी पोलिसांनी अद्याप या संशयित तरुणांना अटक केलेली नाही. विशेष म्हणजे, यासंबंधी तक्रार करणारी विद्यार्थिनी आणि तिची आईच चौकशीच्या फे ऱ्यात सापडल्याने डोंबिवली परिसरात नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
या प्रकरणातील विद्यार्थिनीची आई कल्याणमधील एका सरकारी कार्यालयात अधिकारी आहेत. तिने मुलीच्या मोबाइलवर अश्लील लघुसंदेश आल्यानंतर आरोपी मुलांचा छडा लावण्यासाठी स्वत:च या मुलांच्या घरी जाऊन त्यांना आपण महिला पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले. या भीतीने त्या आरोपी मुलांनी आपले मोबाइल तक्रारदार महिलेच्या ताब्यात दिले. यानंतर पीडित मुलीच्या आईने मोबाइलमधील सीमकार्ड काढून हॅन्डसेट त्या मुलांना परत केले. हे प्रकरण आपल्या मुलांच्या अंगाशी शेकण्याची शक्यता असल्याचे लक्षात येताच संशयित तरुणाच्या आईने याप्रकरणी पीडित मुलीच्या आईविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे अश्लील संदेशावरून सुरू झालेला विषय आता पीडित मुलीच्या आईवर शेकविण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची तक्रार शहरातील काही समाजिक संघटनांनी केली आहे. मुलीची तक्रार घेऊन संशयित तरुणांच्या मोबाइलचे सिमकार्ड घेऊन पोलीस ठाणे गाठणाऱ्या आईला आता स्वत:चा अटकपूर्व जामीन टाळण्यासाठी न्यायालयात धाव घ्यावी लागली आहे. पोलीस या महिलेला ‘तुम्ही सरकारी अधिकारी आहात. तुमची नोकरी या गुन्ह्यात जाऊ शकते’ अशी तंबी देत असल्याची तक्रार पुढे येऊ लागली आहे. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या तरुणांची नावे सागर भोईर, समीर मोरे, आदित्य तिवारी आणि राजू अशी आहेत. हे सर्व ठाकुर्ली व सारस्वत कॉलनीत राहतात.
काय आहे तक्रार?
तक्रारदार महिलेने आपल्या मुलीला महिनाभरापूर्वी एक मोबाइल घेऊन दिला होता. १७ जानेवारी रोजी रात्रीच्या वेळेत मुलीच्या मोबाइलवर तीन वेगळ्या मोबाइलवरून २६० अश्लील लघुसंदेश आणि चित्रफिती पाठविण्यात आल्या. ही विद्यार्थिनी नववीत शिकते. या मुलीने सांगितले, सागर भोईर हा आपणास गेल्या काही दिवसांपासून मी इंजिनीअर आहे. तू मला आवडतेस, असे म्हणत होता. घाबरून हा प्रकार आपण घरात सांगितला नाही, असे या मुलीचे म्हणणे आहे. या मुलीचा मोबाइल नंबर आदित्य तिवारीने या त्रिकुटाला दिल्याचे उघड झाले आहे. तो याच शाळेत शिकत आहे.
शाळा म्हणते..
आपल्या मुलीला काही तरुण बाहेर त्रास देतात म्हणून या महिलेने त्या प्रसिद्ध शाळेच्या मुख्याध्यापिकेला भेटून सगळा प्रकार कथन केला. तेव्हा त्या मुख्याध्यापिकेने तुमचे (आई) व मुलीचे समुपदेशन करणे गरजेचे आहे, असे सांगून या प्रकाराबाबत उदासीनता दाखविल्याचे सांगितले जाते. अखेर पीडित मुलीच्या आईने आपल्या मुलीला त्रास होऊ नये म्हणून एक व्यक्ती मुलीस शाळेतून ने-आण करण्यासाठी नेमली आहे.
परस्परविरोधी तक्रारी
या प्रकरणात परस्परविरोधी तक्रारी दाखल आहेत. मुलीला लघुसंदेश आले आहेत.  पुरावे जमा केल्यानंतर आरोपी मुलांची चौकशी व अन्य प्रक्रिया आम्ही सुरू करणार आहोत. सर्व पुरावे आम्ही तपासणीसाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे पाठविले आहेत. तक्रारदार महिलेने खोटी बतावणी केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्या विरुद्ध १७० कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जाधव यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा