बुलढाणा जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या पाच शेतमजुरांपकी दत्ता माघाडे यांचा अतिमद्य सेवनाने मृत्यू झाला, असे निवेदन रोहयोमंत्री नितीन राऊत यांनी विधान परिषदेत केले. प्रत्यक्षात माघाडे यांनी शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची बाब ठोसपणे पुढे आली. माघाडे यांच्या कुटुंबीयांनीच अतिमद्य सेवनाने त्यांचा मृत्यू झाल्याचा जबाब दिल्याचे राऊत यांनी म्हटले असले, तरी पोलीस पंचनामा व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल मात्र गळफास घेऊन आत्महत्या केल्यानेच हा मृत्यू झाल्याचे धडधडीत स्पष्ट करतो. एका संवेदनशील प्रकरणात मंत्री सभागृहात कशी दिशाभूल करणारी विधाने करतात, हे या निमित्ताने उघड झाले आहे.
‘शेतमजुरांच्या जगण्याचा कडेलोट’ या मथळ्याखाली बुलढाणा जिल्ह्यातील टिटवी व गोत्रा या गावच्या शेतमजुरांच्या आत्महत्येच्या प्रकरणाला ‘लोकसत्ता’ ने वाचा फोडल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. या प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेतही उमटले. नियम ९३ अन्वये आमदार कपील पाटील यांनी या प्रकरणी सूचना उपस्थित केली. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनात रोहयोमंत्री राऊत यांनी जे निवेदन दिले, त्यात बरीच विसंगती आहे. आत्महत्या केलेल्या पाच शेतमजुरांपकी एक असलेल्या दत्ता माघाडे यांच्या मृत्यूबाबत राऊत यांनी केलेले निवेदन हे धादांत दिशाभूल करणारे आहे. माघाडे यांची आत्महत्या टिटवी गावच्या शिवारात ७ जुलला सकाळी साडेदहाच्या सुमारास शेतात िलबाच्या झाडाला गळफास घेतल्याने झाली. माघाडे यांची पत्नी पारुबाई यांनी दिलेल्या माहितीवरून लोणार पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली. शवविच्छेदनात माघाडे यांचा गळफास घेतल्यानेच मृत्यू झाल्याचा स्पष्ट अभिप्राय वैद्यकीय अधिकाऱ्याचा आहे. असे असताना ‘अतिमद्य सेवनाने’ हा मृत्यू झाल्याचे राऊत यांनी संबंधित कुटुंबाच्या कोणत्या जबाबाच्या आधारे सांगितले, हे कळावयास मार्ग नाही.
दरम्यान, आत्महत्या केलेल्या प्रल्हाद श्यामजी कोकाटे, चांगुणाबाई गजानन डाखोरे या मजुरांनी टिटवी येथे मग्रारोहयो अंतर्गत काम केले नाही. तसेच अमृता गोरे, महादा सोनाजी राऊत यांनी गोत्रा येथे मग्रारोहयोतंर्गत काम केले नाही, असेही निवेदन राऊत यांनी केले. मुळात या मजुरांनी सिल्लोड (जिल्हा औरंगाबाद) तालुक्यात केलेल्या कामाचे पसे मिळाले नाहीत, ही वस्तुस्थिती असताना मूळ मुद्याला बगल देत आत्महत्या केलेल्या मजुरांनी लोणार तालुक्यात काम केले नाही, असा अजब खुलासा राऊत यांच्या निवेदनात आहे.

Story img Loader