दादाची शाळा सुटली की नाही, हे पाहण्यासाठी घराबाहेर पडलेले आणि नंतर भरकटलेले दोन चिमुकले मंगळवारी दुपारी शालेय विद्यार्थिनीच्या मदतीने आधाराश्रमात दाखल झाले. त्यांची माहिती संस्थेने लगेच पोलीस ठाण्यात कळविण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, पोलिसांच्या टोलवाटोलवीच्या भूमिकेने कर्मचारी वैतागलेले असतानाच चिमुरडय़ांची आई भयभीत अवस्थेत समोर उभी ठाकली. यावेळी चिमुकले आणि त्यांच्या आईच्या हद्यभेटीने उपस्थितांचे डोळेही पानावले.
अशोक स्तंभ परिसरात रुंग्टा हायस्कूलच्या मागे धुळेकर आणि रहेकर कुटूंबीय राहतात. घरातील पुरूष मंडळी कामासाठी सकाळीच घराबाहेर पडतात. महिला वर्गही जमेल तशी बाहेरील काही कामे करत संसाराचा गाडा ओढतात. मंगळवारी नेहमीप्रमाणे दिवसाची सुरूवात झाली. चिमुकले बाराच्या सुमारास घराबाहेरील अंगणात खेळत होती. मात्र त्याचवेळी रहेकर यांची साडे तीन वर्षांची सावरी हिने दादाची शाळा सुटली का ते पाहु असे सांगत आपला दोन वर्षांचा चुलत भाऊ पवन धुळेकरला सोबत घेत आजीच्या नकळत निघून गेले. फिरत फिरत हे दोघे अशोकस्तंभ परिसरात येऊन पोहचले. वाहनांची गर्दी पाहून घाबरलेले हे दोन्ही चिमुरडे एका कोपऱ्यात बसून रडू लागले. त्यावेळी रुंग्टा शाळेत जाणाऱ्या दोन विद्यार्थिनींनी त्यांना पाहिले. त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना काही सांगताही येत नव्हते. अखेरीस या विद्यार्थिनींनी त्यांना आधाराश्रमाच्या आवारातील बगिच्यात नेऊन बसविले. कदाचित ही मुले येथील असतील असे समजून त्या निघून गेल्या. बाहेर रडणारी मुले पाहत आश्रमातील कर्मचाऱ्यांनी त्यांची विचारपूस केली. तेव्हा सावरीने आम्ही हनुमान वाडीत राहतो असे सांगितले. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दूरध्वनी केला. मात्र ते आपल्या हद्दीतील नाही, तुम्ही पंचवटी पोलीस ठाण्यात संपर्क साधा, असे उत्तर मिळाले. पंचवटी पोलीस ठाण्याने आडगावला दूरध्वनी करा अथवा कोणीतरी या मुलांना घेऊन या असा सल्ला दिला. पोलीस यंत्रणेची टोलवाटोलवी सुरू असतानाच दोन अनोळखी महिला आश्रमात दाखल झाल्या आणि कोणी हरविलेल्या दोन लहान मुलांना येथे आणले का, याची विचारणा केली.
चैत्राली धुळेकर आणि अश्विनी रहेकर यांनी सावरी आणि पवन आमची मुले असल्याचे सांगितले. कामासाठी बाहेर गेलो असताना हा प्रकार घडला. दुपारी बारा वाजेपासून चिमुरडय़ांचा शोध घेत असल्याचे त्यांनी सांगितले. अशोक स्तंभ येथे शालेय विद्यार्थिनींनी त्यांना आधाराश्रमाकडे नेल्याचे कोणीतरी सांगितले. यावेळी संबंधितांनी मुलांची छायाचित्रेही संस्थेतील कर्मचाऱ्यांसमोर सादर केली. हे चिमुकले संबंधितांची असल्याची खात्री पटल्यावर कर्मचाऱ्यांनी दोन्ही मुलांना बाहेर बोलाविले असता सावरीने आईला पाहताच जोरात रडायला सुरूवात केली. तर पवनने आईकडे निरखुन पाहत अंगावर झेप घेतली. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर सापडलेल्या चिमुकल्यांना पाहिल्यावर आईंची भावना अनावर झाली. एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला साजेशा या प्रसंगाने उपस्थितांच्या डोळ्याच्या कडाही पाणावल्या.

Story img Loader