सध्या ‘व्हॉटस अॅप’वरून एक मेसेज फिरतोय. त्यात एक छोटय़ा मुलीचा फोटो आहे. ‘नाशिक पोलिसांना ही मुलगी सापडली असून तिला तिच्या पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करा,’ असा हा संदेश आहे. प्रत्येक जण चांगल्या भावनेतून तो मेसेज पुढे फॉरवर्ड करतोय. हा मेसेज अखेर त्या मुलीच्या वडिलांपर्यंत पोहोचला. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता असलेली आपली मुलगी सापडल्याने जणू स्वर्गच हाती लागल्याचा आनंद त्यांना झाला. त्याच रात्री ते नाशिकला गेले. पण तेव्हा समजले की अशी कुठलीही मुलगी नाशिक पोलिसांना सापडलेली नाही, आणि हा मेसेजही खोटा होता. पुन्हा पदरी निराशा पडली. फोटोत दिसणारी ती मुलगी आपलीच आहे. मग मेसेज कुणी पसरवला. या गूढ प्रश्नाबरोबर पुन्हा त्या पित्याने मुलीचा शोध सुरू केला आहे. कमर आलम खान हे वांद्रे येथे राहतात. फॅब्रिकेशनचे काम करतात. तीन वर्षांपूर्वी ते नालासोपारा येथील नातेवाईकांकडे ईदनिमित्त गेले होते. त्यांची मुलगी मुस्कान तेव्हा ७ वर्षांची होती. ११ सप्टेंबर २०१० रोजी घराबाहेर खेळत असताना मुस्कान बेपत्ता झाली. त्यांनी त्यावेळी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. पण आजपर्यंत तिचा शोध लागला नाही. खान यांनी स्वत: मुस्कानच्या शोधासाठी अनेक प्रयत्न केले. सर्वत्र तिच्या छायाचित्राची पोस्टर लावली होती. जिथे जिथे माहिती मिळेल तिथे तिथे ते पैसे खर्च करून शोधायला जात. मुंबईबरोबरच त्यांनंी पुणे, गुजरात, राजस्थान आणि दिल्ली येथेही जाऊन मुस्कानचा शोध घेतला. जिथे जिथे मुस्कान सारखी दिसणारी मुलगी आढळायची तिथे ते लगेच पोहोचायचे. गेली तीन वर्षे त्यांची ही शोध मोहिम सुरू होती. अनेक राज्यात जाऊन त्यांनी मुस्कानचे फोटो फलाटावर, बसस्थानकात, चौकात लावले आहेत. २०१२ मध्ये त्यांनी उच्च न्यायालयात मुस्कानचा शोध लवकर व्हावा म्हणून याचिकाही दाखल केली होती. २७ जानेवारीला न्यायालयाने दोन आठवडय़ात मुस्कानचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत.
क्रूर चेष्टा
काही दिवसांपासून व्हॉटस अॅपवर मुस्कानचा फोटो फिरतोय. नाशिक पोलिसांना ती सापडली असून तिच्या पालकांपर्यंत पोहोचवायला मदत करा, असा संदेश त्यासोबत आहे. या फोटोच्या बाजूला एक महिला पोलीस हवालदार बसलेली दिसतेय. तिचा चेहरा दिसत नाही. पण पोलीस गणवेषातील साडी दिसतेय. या निरागस चिमुकलीचा चेहारा पाहून हा मेसेज भराभर पुढे सरकवला जातो आहे. अखेर तो कमर खान यांच्यापर्यंत पोहोचलाही. त्यांना तर जणू स्वर्ग गाठल्याचा आनंद झाला. व्हॉटस अॅपच्या फोटोत दिसणाऱ्या मुस्कानला त्यांनी ओळखले. लगेच त्यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस सोबत येण्याची वाट न बघता ते लगेच नाशिकला रवाना झाले. पण त्यावेळी अशा प्रकारची कुठलही मुलगी सापडली नसल्याचे त्यांना समजले. कुणीतरी ही क्रूर चेष्टा केली होती. पण फोटोत दिसणारी तर मुस्कानच आहे. मग ती आहे कुठे आणि हा फोटो पाठवला कुणी असा सवाल कमर खान यांनी उपस्थित केला आहे. तिच्या सोबत पोलीस वेषातील महिला दिसते. पण कुठल्याही पोलीस ठाण्यात मुस्कानच्या सापडल्याची नोंद नसल्याने या फोटोमागचे गूढ वाढले आहे. त्यामुळेच खान यांनी आता फोटोचे गूढ उकलण्यासाठी सायबर सेलकडे तक्रार करून मदत मागितली आहे. फोटोतली मुलगी माझी मुस्कान आहे. ती जिवंत आहे, हीच आमच्यासाठी समाधानाची बाब आहे, असे त्यांनी सांगितले. ज्यांनी कुणी फोटो पाठवला त्याची भावना चांगली असेल पण ठिकाण चुकीचे असेल, असेही ते म्हणाले.
भावनांशी खेळ
रेल्वे स्थानकात हरविलेल्या व्यक्तींचे छायाचित्र लावून खाली संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांकही दिलेला असतो. काही महिन्यांपूर्वी एकाला या क्रमांकावर एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला होता. तुमचा मुलगा मला सापडला असून मला त्यासाठी १० हजार रुपये द्या, अशी मागणी त्याने केली. त्या मुलाचे वडील तयारही झाले होते. पण नंतर समजले की त्याने पैसे उकळण्यासाठी हे कृत्य केले आहे. अखेर पोलिसांनी त्याला गजाआड केले. पैसे मिळविण्यासाठी अगदी टोकाला जाऊनही भावनांशी खेळले जाते हे या निमित्ताने दिसून आले.
व्हॉटस अॅपवरून क्रूर चेष्टा
सोशल मिडियाचा उपयोग आणि दुरुपयोग आपल्याला चांगलाच परिचित आहे. ‘व्हॉट्स अॅप’ या नव्या आयुधाबाबतही असेच म्हणता येईल. ‘व्हॉट्स अॅप’च्या मदतीने एकीकडे उपयुक्त आणि आवश्यक माहिती बिनखर्चात लक्षावधींपर्यंत पाठवता येऊ शकते, एखादी दुर्घटना टाळता येऊ शकते, कुणाचा जीव वाचवता येऊ शकतो. तर याच मार्गाचा वापर करून कुणीतरी विकृत एखाद्याची क्रूर चेष्टाही करू शकतो. ‘व्हॉट्स अॅप’च्या अशा दुहेरी वापराच्या या दोन कहाण्या!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा