ठाणे, कळवा आणि मुंब्रा या तीन शहरांमध्ये वेगाने सुरू असलेल्या नागरीकरणाच्या तुलनेत अंत्यविधीसाठी वापरल्या जाणाऱ्या स्मशानभूमींची संख्या फारच तोकडी पडू लागली असून नागरी सुविधांचा महत्त्वाचा भाग असलेली ही व्यवस्था अपुरी पडू लागल्याचे वास्तव ठाणे महापालिकेस उशिरा का होईना लक्षात येऊ लागले आहे. विशेष करून मूळ शहराच्या पश्चिमेकडे झपाटय़ाने विकसित होत असलेल्या घोडबंदर परिसरासाठी पुरेशा प्रमाणात स्मशानभूमींची व्यवस्था नसल्याचे लक्षात आल्याने महापालिकेने भाइंदर पाडा आणि कावेसर परिसरात स्मृती उद्यानासह भली मोठी स्मशानभूमी उभारण्याचा निर्णय घेतला असून यासाठी मूळ आरक्षणात बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. नियोजनाच्या आघाडीवर एरवी सपाटून मार खाणाऱ्या महापालिकेने २०४१ पर्यंत लोकसंख्या वाढीचा विचार करून अंत्यविधीसाठी आवश्यक व्यवस्थेची आतापासूनच उभारणी करण्याचा विचार सुरू केला असून त्यासाठी दीर्घकालीन अशा आराखडय़ावर काम केले जात आहे.
ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या एव्हाना २० लाखांच्या घरात पोहोचली असली तरी मूलभूत सुविधांविषयीची वानवा या शहरात जागोजागी आढळून येते. महापालिका हद्दीत सद्यस्थितीत हिंदूू धर्मातील अंत्यविधीसाठी ३७ स्मशानभूमी वापरात आहेत, तर खासगी संस्थांच्या माध्यमातून २२ ठिकाणी अंत्यविधी उरकले जातात. यामध्ये ११ ठिकाणी मुस्लीम दफनभूमी, तीन ठिकाणी ख्रिश्चन तर पारसी, बोहरा आणि ज्यू समाजासाठी अंत्यविधीची व्यवस्था उपलब्ध आहे.
दादोजी कोंडदेव स्टेडियमलगत जवाहरबाग ही मध्यवर्ती स्मशानभूमी असून या ठिकाणची जागा अतिशय कमी पडू लागल्याने खाडी परिसरात नव्याने स्मशानभूमी विकसित करण्याचा विचार महापालिका करत आहे. ठाण्यातील वेगवेगळ्या भागांमधून जवाहरबाग स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या रहिवाशांचा आकडा बराच मोठा आहे. महापालिकेने शहरात अवघ्या तीन ठिकाणी एलपीजीवर अंत्यविधीची व्यवस्था केली असून एकाही ठिकाणी विद्युतदाहिनी उपलब्ध नाही. ३७ ठिकाणी पारंपरिक पद्धतीने अंत्यविधीची व्यवस्था उपलब्ध असली तरी शहराची भौगोलिक व्यवस्था लक्षात घेता जवाहरबाग या मध्यवर्ती ठिकाणी येणाऱ्या नागरिकांचा आकडा बराच मोठा आहे.
घोडबंदर भागात सुविधांची वानवा
गेल्या काही वर्षांत लोकसंख्येचे विक्रम मोडीत काढणाऱ्या घोडबंदर परिसरात ही व्यवस्था पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. या भागासाठी एखादी मध्यवर्ती स्माशानभूमी उभारली जावी, अशी मागणी या ठिकाणच्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडून वारंवार करण्यात येत होती. मध्यंतरी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी या प्रश्नावर पक्षाच्या नगरसेवकांसह आयुक्त असीम गुप्ता यांची भेट घेतली होती.
दरम्यान, घोडबंदर विभागाची मागणी लक्षात घेऊन महापालिकेने भाइंदरपाडा येथे सुमारे ३७ हजार चौरस मीटरच्या भूखंडावर संयुक्त स्मशानभूमी आणि स्मृती उद्यानाचा मोठा प्रस्ताव तयार केला असून कावेसर येथील शासकीय भूखंडावर अशाच स्वरूपाच्या प्रस्तावावर काम केले जात आहे. यासाठी मंजूर विकास आराखडय़ात आवश्यक बदलांची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
नव्या स्मशानभूमीचे प्रस्ताव
कळवा परिसरात खाडीलगत असलेल्या आरक्षणाची जागा शासनाकडून ताब्यात घेण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. मुंब्रा परिसरात संयुक्त स्मशानभूमीसाठी २० हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड आरक्षित करण्यात आला असून कौसा येथील एक हेक्टरच्या जागेत दफनभूमी उभारण्याचा प्रस्ताव वन विभागाच्या अंतिम मान्यतेसाठी रवाना करण्यात आला आहे.
दिवा भागातही अशाच स्वरूपाचा प्रस्ताव विचाराधीन आहे. दरम्यान, सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या ३७ स्मशानभूमींपैकी १२ जागांचा एकत्रित विकास प्रस्ताव तयार केला जात आहे. जवाहरबाग मध्यवर्ती स्मशानभूमीला आणखी पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी लगतच खाडीकिनारी जागा शोधली जात आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा