कळवा, मुंब्रा रेल्वे स्थानक परिसराचा कायापालट करून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आपला खुंटा मजबूत करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कँाग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी सुरू करताच खडबडून जागे झालेल्या शिवसेना नेत्यांनी उशिरा का होईना ठाणे रेल्वे स्थानकाच्या विकासाच्या दिशेने आपला मोर्चा वळविला आहे. अरुंद रस्त्यामुळे पूर्वेकडील बाजूस मोठय़ा प्रमाणावर होणारी वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी या परिसरात सुमारे सहा कोटी रुपये खर्चून वाहतूक सुधारणा प्रकल्प हाती घेण्याचा प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला आहे. याच परिसरात असलेल्या हरियाली तलाव परिसराच्या सुमारे एक हेक्टर परिसराचा विकास करण्यात येणार असून या तलावात नौकायन तसेच मासेमारी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. वर्षांनुवर्षे दुर्लक्षित असलेल्या पूर्व परिसराच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचे प्रस्ताव तयार करण्यात आल्याने लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेने ‘स्टेशन मिशन’ हाती घेतल्याचे स्पष्ट होत आहे.
ठाणे तसेच आसपासच्या रेल्वे स्थानक परिसरात गेली अनेक र्वषे समस्यांचा अक्षरश सुकाळ दिसून येत होता. कळवा, मुंब्रा या दोन्ही स्थानकांभोवती अनधिकृत टपऱ्या, फेरीवाले, बांधकामे, बेकायदा मास विक्री करणाऱ्यांची चलती होती. तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांच्या कार्यकाळात हे चित्र पूर्णपणे बदलले. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा करणारे शिवसेनेचे बंडखोर खासदार आनंद परांजपे यांनी राजीव यांना हाताशी धरून या दोन्ही स्थानक परिसराचा कायापालट घडवून आणला. सुमारे १० ते १५ कोटी रुपयांचा खर्च या स्थानकांच्या विकासाकरिता करण्यात आला. त्यामुळे वाहनतळ, चांगले रस्ते, मोठे प्रवेशद्वार अशा सुविधांचा विकास या स्थानक परिसरात झाला. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर खासदार आनंद परांजपे यांनी आतापासूनच या विकासकामांचा मुद्दा चर्चेत आणण्यास सुरुवात केली असून प्रचाराचा रोख रेल्वे स्थानकांच्या विकासाकडे वळविण्याचा पद्धतशीपणे प्रयत्न केला जात आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात परांजपे यांच्याविरोधात उमेदवाराच्या शोधात असणाऱ्या शिवसेना नेत्यांसाठी हे मुद्दे काहीसे अडचणीचे ठरू लागले आहेत.

Story img Loader