नागपूर-सूरत आणि मुंबई-आग्रा महामार्गावर दररोज चालणाऱ्या धोकादायक वाहतुकीकडे प्रादेशिक परिवहन व महामार्ग पोलीस विभाग कशा पद्धतीने दुर्लक्ष करते, याचे आणखी एक उदाहरण चुनखडीच्या गोण्यांनी भरलेली मालमोटार उलटून झालेल्या अपघाताने पुढे आले आहे. प्रादेशिक परिवहन विभागाचे विविध तपासणी नाके सातत्याने वादग्रस्त ठरत असल्याने चर्चेत राहिली आहेत.
अवजड वाहने नोंदविण्यापासून ते राष्ट्रीय महामार्गावरून धोकादायक वाहतूक करण्यापर्यंत वाहनधारक व मालकांचे या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी घनिष्ठ संबंध असल्याचे अधोरेखीत होते. यामुळे बोकाळलेल्या धोकादायक वाहतुकीत जीव मात्र सर्वसामान्यांना गमवावा लागत असल्याचे चित्र आहे.
नागपूर-सूरत महामार्गावर सोनगड शिवारात झालेल्या मालमोटार अपघातात सहा ऊसतोड मजूर जागीच ठार झाले. त्या पाठोपाठ याच महामार्गावर चुनखडीच्या गोण्या घेऊन जाणारी मालमोटार उलटून झालेल्या अपघातामध्ये चार जण ठार झाले. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदविला. परंतु, अशा अपघातांना पायबंद घालण्यासाठी ज्या पद्धतीने पोलीस अथवा प्रादेशिक परिवहन विभागाने जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत, ते होत नसल्याचे पुन्हा उघड झाले आहे. महामार्गावर प्रादेशिक परिवहन विभाग व पोलिसांचे तपासणी नाके आहेत. या दोन्ही विभागांचे कर्मचारी दिवस-रात्र गस्तीवर असतात. वाहनांची तपासणी होताना दिसते. असे असताना मग भीषण अपघात का टळू शकत नाही, असा सामान्यांना पडलेला प्रश्न आहे.
ऊस तोड कामगारांना मालवाहू वाहनांमध्ये कोंबणे, क्षमतेहून अधिक मालाची वाहतूक करणे, असे किती वाहनचालक तपासणी नाक्यांवरून मार्गस्थ होतात, हे कोणी सांगण्याची आवश्यकता नाही. या दोन्ही महामार्गावर आणि धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील तपासणी नाक्यांवरील अर्थपूर्ण व्यवहार सर्वश्रुत आहे. परंतु, महामार्गावरील पोलिसांचा धाक दिवसेंदिवस का कमी होत चालला याची अनेक संतापजनक उदाहरणे पुढे आली आहेत.
एखाद्या अवजड वाहनाची नोंदणी ६ जून २०१२ असली आणि त्याच्या अर्ज क्रमांक २१ ची तारीख ७ जून २०१२ असली तर साधारणपणे या वाहनाच्या बांधणीला किमान १५ दिवसांचा कालावधी लागणे गृहीत धरता येईल. पण, कंपनीतून बाहेर पडण्याआधीच जर असे वाहन प्रत्यक्ष बघितल्याची नोंद असली तर त्यात नियमांचे पालन झाले असे म्हणता येईल का ? अर्ज क्रमांक २१ ची तारीख ७ जून २०१२ आणि संबंधित अधिकाऱ्याने वाहन पाहिल्याची तारीख ६ जून २०१२ हा अनाकलनीय गोंधळ जाणीवपूर्वक करणारे परिवहन विभाग मूळ धुळे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या वाहन मालकाने मालेगाव येथे विमा काढला असला तरी बेमालुमपणे अभय कसे देऊ शकतात. या एकाच उदाहरणावरून प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज कोणत्या धाटणीने चालते ते लक्षात येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा