अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या नियामक मंडळाची निवडणूक  मुंबईमध्ये गाजत असताना उपराजधानीत आरोप प्रत्यारोपांनीदिवसेंदिवस रंगत येत आहे. गेल्या काही दिवसात टपाल विभागातून मतपत्रिकांची पळवापळवी सुरू असल्यामुळे मतपत्रिका मिळाल्या नसल्याची तक्रार काही सदस्यांनी धर्मादाय आयुक्ताकडे केली आहे.
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या मध्यवर्ती शाखेत राज्यातील सर्व नाटय़ शाखांमधील सदस्यांना प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी दर पाच वर्षांनी निवडणूक घेतली जाते. त्यात विदर्भातील पाच सदस्यांचा समावेश असतो. विदर्भातून पाच जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असून त्यात दिलीप ठाणेकर आणि प्रमोद भुसारी यांच्या नेतृत्वाखाली दोन वेगवेगळे गट निवडणूक लढत आहेत. विद्यमान कार्यकारिणीत दिलीप ठाणेकर, अकोल्याचे शशिकांत जोशी, नागपूरचे प्रशांत जोशी, गिरीश पांडे आणि अविनाश किन्हीकर या विदर्भातील पाच सदस्यांचा मध्यवर्ती शाखेच्या नियामक मंडळात समावेश होता. यावेळी जुन्या पाच सदस्यांना वगळून नवीन पाच सदस्य पाठविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून नाटय़ परिषदेमध्ये रस्सीखेच सुरू असताना सर्वच उमेदवारांनी आता ‘फोन अ फ्रेंड’च्या माध्यमातून मतदारांशी संपर्क करणे सुरू केले आहे. प्रत्येक मतदाराच्या नावाने मतपत्रिका त्यांच्या घरच्या पत्त्यावर पाठविण्यात आल्या असल्या तरी त्या टपाल विभागातून गायब केल्या जात असल्याची तक्रार अनेक मतदारांनी केली. निवडणुकीतील उमेदवार आणि त्यांचे समर्थक घरोघरी जाऊन मतपत्रिका गोळा करण्याचे काम करीत आहेत.
 अनेक मतदारांच्या घरी टपाल विभागातून मतपत्रिका पोहोचलेल्या नाहीत, त्यामुळे मतदार उमेदवारांकडे तक्रारी करू लागले आहेत. टपाल विभागात बंद लिफाप्यात आलेल्या मतपत्रिका गायब कशा होतात, त्या कोण घेऊन जातात अशी विचारणा मतदार करू लागले आहेत. ज्यांच्याकडे मतपत्रिका पोहोचल्या नाहीत, त्यांनी धर्मादाय आयुक्ताकडे अर्ज केले. विदर्भात एकूण १८४६ मतदार असून त्यात नागपूरचे ७३६, अमरावती ११३, अकोला १५८, वाशीम २१०, कारंजा ४४९ आणि मानोरा १८० मतदारांचा समावेश आहे. वाशीम जिल्ह्य़ातून ८३९ मतदार आहेत. मतदार यादीत अनेक मृत सदस्यांची नावे असून त्यांच्या नावाने आलेल्या मतपत्रिकासुद्धा गायब केल्या जात असल्याचा आरोप परिषदेचे सदस्य आणि उमेदवार एकमेकांवर करू लागले आहेत. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या नागपूर शाखेचे कार्यालय रामदासपेठमध्ये असताना निवडणूक अधिकारी आणि परिषदेचे कार्यवाह प्रफुल्ल फरकासे यांनी शंकरनगरातील वनराईच्या कार्यालयात निवडणूक कार्यालय सुरू केले. त्यावर परिषदेचे सदस्य संजय वानकर आणि उमेदवार निरंजन कोकर्डेकर यांच्यासह २० सदस्यांनी आक्षेप घेत निवडणूक कार्यालय बदलविण्यात यावे, अशी मागणी केली होती, मात्र त्या मागणीवर धर्मादाय आयुक्तांकडून फारसा विचार करण्यात आला नाही. प्रमोद भुसारी, किशोर आयलवार, अ‍ॅड. पराग लुले, दिलीप देवरणकर, अशोक ढेरे, दिलीप ठाणेकर, शशिकांत जोशी, निरंजन कोकर्डेकर, यशवंत पदमगिरीवार, अ‍ॅड. प्रशांत देशपांडे, विनोद तुंबडे आणि शिवराजा आप्पा राऊत हे बारा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, काही उमेदवारांनी मतपत्रिका मतदारांना मिळत नसल्याचे सांगून या संदर्भात धर्मादाय आयुक्ताकडे तक्रार केल्याचे परिषदेचे सदस्य संजय वानकर यांनी सांगितले. १७ फेब्रुवारीपर्यंत मतदारांना मतदान केंद्रामध्ये ठेवण्यात आलेल्या पेटीमध्ये मतपत्रिका टाकायच्या आहेत आणि २० फेब्रुवारीला मतमोजणी होईल.