पुणे विद्यापीठाच्या परिक्षा गैरव्यवहारसंबंधी काही कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे, त्यामुळे विद्यापीठाच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, याचे गांभीर्य लक्षात घेऊन विद्यापीठ विकास मंचच्या माध्यमातून मंगळवारी (दि. २९) चर्चासत्र आयोजित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य प्रा. राजेंद्र काळे यांनी पत्रकाद्वारे दिली.
प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी संघटना, अधिसभा सदस्य, विद्वतसभा, व्यवस्थापन परिषद सदस्य यांना या चर्चासत्रासाठी निमंत्रित करण्यात आले असून चर्चासत्र पुण्यातील आबासाहेब गरवारे कॉलेजच्या एबी हॉलमध्ये दुपारी ४.३० वाजता होईल. विद्यापीठाच्या विद्यमान परिक्षा व्यवस्थेसंबंधी मुक्त चर्चा करुन त्या आधारे कृती आराखडा कुलगुरुंना सादर केला जाणार आहे. त्यामुळे संबंधितांनी चर्चासत्रात सहभागी व्हावे, असे आवाहन मंचचे प्रांताध्यक्ष राजेश पांडे व निमंत्रक प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.
ऑक्टोबरमध्ये झालेल्या अधिसभेच्या बैठकीतही आपण परिक्षा विषयक गैरप्रकारांबाबत विविध सूचना करत स्थगन प्रस्ताव मांडला होता, त्यावेळीही प्रशासनाने परिक्षा व्यवस्थेत युद्धपातळीवर सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच मंचच्या शिष्टमंडळाने कुलगुरुंना निवेदन देऊन काही उपाय सुचवले होते. असे असतानाही विद्यापीठाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या अटकेची परिस्थिती उद्भवणे चिंताजनक असल्याने समान भूमिका घेणाऱ्यांना एकत्र आणण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन केल्याचे काळे यांनी सांगितले.

Story img Loader