उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्य़ातून या पुस्तकांची छपाई करण्यात आली. त्याऐवजी महाराष्ट्रातील मुद्रणालयातून हे काम करण्यास कोणत्या अडचणी होत्या, असा सवाल भारतीय दलित पँथरचे अध्यक्ष प्रकाश बन्सोड यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने केलेली अक्षम्य चूक लक्षात घेता संबंधित पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बन्सोड यांनी केली. शिवाय दोन लाख पुस्तकांच्या वाहतुकीवर महाराष्ट्र शासनाने केलेला खर्च सामान्य माणसाच्या कराच्या पैशातून केला गेला आहे. छपाई आणि त्याला जोडून इतर खर्च कोटीच्या घरात आहे. शिक्षणासारख्या संवेदनशील आणि गंभीर विषयाकडे पाठय़पुस्तक निर्मिती करणारा विभाग किती गांभीर्याने लक्ष देतो याचे हे उदाहरण आहे. तरी याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांकडून झालेले नुकसान वसूल करण्यात यावे, अशी मागणी बन्सोड यांनी केली आहे.
सदोष पुस्तकांची छपाई करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांवर नाहक भरुदड बसण्याची वेळ आली आहे. शिक्षकांनाही याचा फटका बसणार असल्याने सदोष छपाईच्या पुस्तके बदलून कोण देणार हा कळीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना शासनाने सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठय़पुस्तके, स्वाध्याय पुस्तिकांचे शाळांमधून वितरण केले. त्यानुसार इयत्ता सातवीच्या मराठी बालभारती पुस्तकातील पान क्रमांक ८६पर्यंत पाने उलटी जोडण्यात आली आहेत.
या गंभीर चुकीचा भरुदड विद्यार्थी व पालकांना भोगावा लागणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना पुस्तक सरळ वाचण्यात अडचणी येणार आहेत. पुस्तकातील ३२ पाने चुकीच्या पद्धतीने बाईंडिंग करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येते.
महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ यांनी प्रकाशित केलेली असून पुस्तकाचे प्रकाशक पाठय़पुस्तक निर्मिती मंडळाचे नियंत्रक विवेक गोसावी असून निर्मिती कार्याची जबाबदारी मुख्य निर्मिती अधिकारी सच्चिदानंद आफळे, निर्मिती अधिकारी सुनील कसबेकर आणि निर्मिती साहाय्यक नितीन वाणी यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
उत्तर प्रदेशातील बिजौली झाशी येथील पीतांबरा बुक्स प्रा.लि. पुस्तकाचे मुद्रक आहेत. मुद्रणादेशानुसार एकूण दोन लाख प्रतींची छपाई करण्यात आली असून वरील चूक ही सर्वच पुस्तकांबाबत आहे की निवडक पुस्तकांमध्येच हे समजायला मार्ग नाही. शालेय विद्यार्थी ती पुस्तके शाळेतून बदलून मागत आहेत. मोठय़ा प्रमाणात ही पुस्तके बदलून देण्यास शिक्षक असमर्थ आहेत.