माहीम रेल्वे स्थानकात दोन महिन्यांपूर्वी सापडलेल्या एका अनोळखी मृतदेहाची ओळख पटली असून अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचे उघड करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. माहीम रेल्वे स्थानकाच्या दोन आणि तीन क्रमांकाच्या फलाटाच्या कडेला असलेल्या जुन्या सिग्नल केबिनच्या पहिल्या माळ्यावर ४ सप्टेंबर रोजी रेल्वे पोलिसांना एका अनोळखी पुरुषाचा नग्नावस्थेत मृतदेह सापडला होता. त्याचे गुप्तांग कापण्यात आले होते. या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी काहीही पुरावा उपलब्ध नव्हता. रेल्वे पोलिसांनी या मृतदेहाबाबत माहीम, शाहूनगर, धारावी, माहीम खाडी, माटुंगा आणि वांद्रे येथे तपास केला. त्यावेळी भंगार गोळा करणाऱ्या बशीर मामू तथा बशीर हुसैन सय्यद (४४) याचा मृतदेह असून पाच वर्षांपासून तो माहीम परिसरात राहत असल्याचे पोलिसांना समजले. तो मूळचा मिरजचा असल्याचेही स्पष्ट झाले. पोलिसांनी भंगार सामान गोळा करणाऱ्या सुमारे ७०-८० स्त्री-पुरुषांकडे चौकशी केली असता त्यापैकी एकाने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी महमद हसन महमद चाँद शेख (२०) या तरुणास माहीम पोलीस ठाण्याजवळील पदपथावरून अटक केली. बशीर मामू हा आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवत होता. याबाबत आपण त्याला दोनवेळा रंगेहाथ पकडले होते. मात्र तरीही तो ऐकत नव्हता. म्हणून राग येऊन आपण त्याची हत्या करण्याचा कट आखला. मित्र इम्रान, सोनू आदींच्या सहाय्याने आपण बशीरला ४ सप्टेंबर रोजी जुन्या केबिनमध्ये नेऊन दारू पाजली आणि त्याचे गुप्तांग कापून त्याची हत्या केली, अशी कबुली महमद हसन याने पोलिसांकडे दिली. पोलिसांनी महमद हसन आणि इम्रान हुसेन अहमद हुसेन (२८) यांना अटक केली असून अन्य दोन आरोपी फरार आहेत.    

Story img Loader