सत्ताधारी मंडळींकडून सत्तेचा गैरवापर करीत समाजातील शक्तिस्थाने मोडण्याचे पाप सुरू आहे. या विरोधात सर्वानी एकत्रितपणे लढून सामान्य माणसाची संघटना वाचवावी असे आवाहन आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांनी केले.
सवादे (ता. कराड) येथे कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वसंतराव जगदाळे होते. या वेळी ग्रामबीजोत्पादन अंतर्गत सोयाबीन बियाणे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले.
उंडाळकर म्हणाले की, राजकारणातील अपप्रवृत्तीशी सातत्याने माझा संघर्ष सुरू आहे. सत्ता आली की पुढाऱ्यांच्या प्रॉपर्टी वाढतात. या मंडळींना पैशातून सत्ता मिळवण्याचा हव्यास सुटतो. पुनश्च तोच प्रकार मतदारसंघात सुरू आहे. गावागावात हस्तक नेमून निवडणुकांवर डोळा ठेवला जात आहे. अशा प्रवृत्तीचा संघटितपणे लोकशाही मार्गाने पराभव करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे. राजकीय जीवनात एकही शिंतोडा उडवून घेतला नसून, विकासातून जनतेचे दरडोई उत्पन्न वाढवण्याचा आपला प्रयत्न आहे.
वसंतराव जगदाळे म्हणाले, की दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या तालुक्यात सुरू असलेले सूडबुद्धीचे व घाणेरडे राजकारण दुर्दैव आहे. जनतेतल्या पुढाऱ्यांना सत्तेच्या माध्यमातून बदनाम करण्याचे षडयंत्र सध्या सुरू आहे. पहिलवान शिवाजीराव जाधव, बांधकाम विभागाचे आर. आर. चव्हाण, मंडल कृषि अधिकारी ए. एस. पटेल यांनी मनोगत व्यक्त केले.  

Story img Loader