महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस व विजय फाऊंडेशन पुणे आयोजित पु. ल. देशपांडे एकांकिका स्पर्धेतील ८वा महाकरंडक मुंबईच्या मिथक थिएटरनिर्मित ‘रिश्ता वही सोच नई’ या एकांकिकेस मिळाला आहे. कलाकारांच्या या संघास ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिकही देण्यात आले.
गेली आठ वर्षांपासून या एकांकिका स्पर्धा राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक व अमरावती अशा पाच विभागांतून घेतल्या जात असून, अंतिम फेरी अकलूजच्या स्मृती भवनात होते. त्यानुसार दि. २४ व २५ नोव्हेंबर रोजीही स्पर्धा होऊन त्यामध्ये ३१ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असणारा द्वितीय क्रमांक पुण्याच्या बालाजी ऑन क्रिएशनच्या ‘मोहोर’ एकांकिकेस मिळाला. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ‘अश्वत्थामा कृतो कृत:’ व नागपूरच्या बोधी फाऊंडेशनच्या ‘गजरा’ या एकांकिकांना २१ हजार रोख, स्मृतिचिन्ह व तृतीय क्रमांक विभागून दिला. तर जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयाच्या ‘सावडेकर तावडेकर हाजिर हो’, ब्रीजलाल बियाणी महाविद्यालय अमरावतीच्या ‘हिस्टरी ऑफ लिजंड्स’ या एकांकिकांना उत्तेजनार्थ प्रत्येकी पाच हजारांचे रोख बक्षीस व स्मृतिचिन्ह देण्यात आले. वैयक्तिक प्रत्येकी एक हजाराची बक्षिसे ओंकार राऊत (मुंबई), तर उत्तेजनार्थ हेमंत पाटील (जळगाव), ज्ञानेश भिलारे (पुणे), सिद्धेश्वर थोरात (मुंबई), उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून भक्ती देसाई (मुंबई), तर उत्तेजनार्थ मंजुश्री भगत, अश्विनी पिंपळकर, तृप्ती कांजकर, भाग्यश्री भिलेकर (नागपूर) व वैष्णवी जगताप (नागपूर) यांना मिळाला. नागपूरच्या प्रथमेश राऊतला उत्कृष्ट बालकलाकाराचे बक्षीस मिळाले. लेखक हेमंत कुलकर्णी (जळगाव), दिग्दर्शक अद्वैत दादरकर (मुंबई), प्रकाशयोजना स्वप्निल मूरकर (मुंबई), संगीत चरण जाधव व भारत जाधव (औरंगाबाद), नेपथ्य रणजित पाटील (मुंबई), वेशभूषा डॉ. अशोक बंडगर (औरंगाबाद) यांना वैयक्तिक उत्कृष्टतेची बक्षिसे मिळाली. या वेळी संयोजक माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पुढील वर्षीपासून या अंतिम स्पर्धा नाशिकला घेणार असल्याचे जाहीर केले. अ‍ॅड. प्रवीण तरडे, प्रणीत कुलकर्णी व अ‍ॅड. रमेश परदेशी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

Story img Loader