अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (जेईई) ‘एमकेसीएल’ने पुढाकार घेतला आहे. संस्थेतर्फे महाराष्ट्रात एकाच वेळी ५ हजार ठिकाणी सराव परीक्षांचा अद्ययावत अभ्यासक्रम माफक शुल्कात उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांनी दिली आहे. कराडच्या सनबीम इन्फोटेकचे संचालक सारंग पाटील उपस्थित होते.
अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वी ‘ऑल इंडिया इंजिनिअरिंग एन्ट्रन्स एक्झामिनेशन’(एआयईईई) आणि जेईई या परीक्षा द्याव्या लागत असत. या परीक्षा किती अवघड असत, त्यांचे निकाल कसे लागतात हे सर्वज्ञात आहे. परंतु, यावर्षीपासून जेईई ही ‘एक देश-एक सामूहिक प्रवेश परीक्षा’ या संकल्पनेवर आधारित एकच परीक्षा घेण्यात येणार आहे. ही प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी तंत्रशिक्षण संस्थांमध्ये अभियांत्रिकेच्या प्रवेशास पात्र ठरणार आहेत.
या परीक्षेची तयारी करता यावी तसेच या परीक्षेत महाराष्ट्राचा टक्का वाढावा यासाठी ‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळा’तर्फे (एमकेसीएल) माफक शुल्कात सराव परीक्षांचा अद्ययावत अभ्यासक्रम महाराष्ट्रात एकाच वेळी ५ हजार ठिकाणी ‘एमएस सीआयटी’ केंद्रावर उपलब्ध करून दिला आहे. हा अभ्यासक्रम ‘एमएस-सीआयटी’ केंद्रामध्ये तसेच ‘ऑनलाईन’ स्वरूपात असणार आहे. या अभ्यासक्रमाचे शुल्कही ४ हजार रुपये तर ऑनलाईनसाठी बाराशे रुपये असे माफक आहे. शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांद्वारे आखण्यात आलेला हा अभ्यासक्रम ‘जेईई’ परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणारा व त्यांची तयारी करून घेणारा आहे. या सराव परीक्षेमुळे महाराष्ट्र पातळीवर विद्यार्थ्यांना रँकिंग मिळेल. या परीक्षेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही jee.mkcl.org या संकेतस्थळावर किंवा ९३२६५५२५२५ क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेसाठी ‘एमकेसीएल’चा पुढाकार
अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (जेईई) ‘एमकेसीएल’ने पुढाकार घेतला आहे.
First published on: 07-12-2013 at 02:15 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mkcl initiatives for engineering entrance exams