वैद्यनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष खासदार गोपीनाथ मुंडे सभासदांसमोर बोलत असतानाच भाजप बंडखोर आमदार धनंजय मुंडे आपल्या समर्थकासह सभास्थळी पोहोचले व थेट व्यासपीठावर जाऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. खासदार मुंडे यांनीही भाषण थांबवून निवेदन स्वीकारले आणि वातावरणातील तणाव निवळला.
दीड वर्षांपूर्वी कौटुंबिक व राजकीय फाटाफुटीनंतर मुंडे कुटुंबांत उभा संघर्ष पेटल्यानंतर प्रथमच मुंडे काका-पुतणे जाहीरपणे समोरासमोर आले. परळी वैजनाथ तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ कारखाना खासदार मुंडे यांनी उभा केला. कारखान्याचा एकहाती कारभार खासदार मुंडे व त्यांचे ज्येष्ठ बंधू पंडितराव मुंडे पाहत. मात्र, दीड वर्षांपूर्वी कौटुंबिक फाटाफुटीनंतर पंडितराव मुंडे यांनी थेट राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांचे चिरंजीव भाजपचे विधान परिषद आमदार धनंजय यांनीही राष्ट्रवादीशी घरोबा केला. जिल्हा परिषद निवडणुकीपासून मुंडे बंधू व काका-पुतण्यांमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे. वैद्यनाथ कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जवळ येत असल्याने मुंडे कुटुंबातील राजकीय संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे. मागील महिन्यात आमदार मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचाराबाबत आरोप करून शेतकऱ्यांना २२५० रुपये भाव द्यावा, अशी मागणी केली. सर्वसाधारण सभेत कारखाना प्रशासनाला या बाबत जाब विचारू, अशी घोषणाही केली होती. त्यामुळे सोमवारी कारखान्याच्या ११व्या सर्वसाधारण सभेकडे सर्वाचे लक्ष लागले होते. काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दुपारी सभा सुरू झाली. बाराच्या सुमारास अध्यक्ष खासदार मुंडे सभासदांसमोर भाषण करीत होते. त्याच वेळी राष्ट्रवादीचे पंडितराव मुंडे व त्यांचे चिरंजीव आमदार धनंजय समर्थकांसह कारखाना प्रवेशद्वारावर दाखल झाले. या वेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक पालवे यांनी मध्यस्थी करून पंडितराव मुंडे यांच्याशी चर्चा करून आमदार धनंजय यांना निवेदन देण्यासाठी सभास्थळी घेऊन गेले. आठ दिवसात निर्णय घ्यावा, अन्यथा कारखान्यासमोर बेमुदत उपोषण करू, अशी घोषणा केली. खासदार मुंडे यांनी आमदारांच्या निवेदनातील सूचना योग्य असल्यास विचार करू, असे स्पष्ट केले. कारखान्याचा अध्यक्ष या नात्याने शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेतले. गाडी, डिझेल, भत्ता कधी घेतला नाही, हे सर्व माहित असताना संचालकांनी (पंडितराव मुंडे, उत्तमराव आघाव व भाऊसाहेब नायबळ) यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करावेत, हे चुकीचे आहे. या आरोपामुळे प्रचंड वेदना झाल्या. कारखाना चांगला चालला आहे. विनाकारण राजकारणासाठी विरोध म्हणून आरोप करू नयेत आणि चांगल्या कामात मिठाचा खडा टाकू नये, असे आवाहन खासदार मुंडे यांनी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा