मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपूर विभागातील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विधानसभा तसेच विधान परिषद सदस्यांची आज मुंबईत बैठक घेतली. या बैठकीत दक्षिण-पश्चिम नागपूरचे तरुण भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहरातील विविध समस्यांबाबत अतिशय आक्रमकपणे भूमिका घेऊन मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून घेतले. महावितरणच्या इन्फ्रास्ट्रक्चर प्लानमध्ये विदर्भावर झालेला अन्याय, विदर्भाचे बांबू धोरण हे मुद्दे आमदार फडणवीस यांनी अतिशय प्रभावीपणे उचलून धरले. यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना सहा निवेदने सादर केली.
नागपूरनजीकच्या गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाच्या उभारणीसाठी तातडीने कार्यवाही करून पीपीपी मॉडेल ऐवजी केंद्र शासनाकडे जमा असलेल्या कॅम्पा फंडातून महाराष्ट्राचा निधी वळवावा, अशी सूचना फडणवीस यांनी केली. तसेच मध्य भारतातील रुग्णांवरील उपचारासाठी अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असलेल्या मेयो आणि सुपर स्पेश्ॉलिटी रुग्णालयाच्या विकासासाठी राज्य सरकारने पावले उचलावी, असा आग्रह फडणवीस यांनी धरला. सुपरस्पेश्ॉलिटी रुग्णालातील किडनी प्रत्यारोपण युनिट तीन वर्षांपासून बंद आहे, ५०० जागा अद्याप भरण्यात आलेल्या नाहीत, कर्करोग उपचार केंद्रातील असुविधांमुळे होणारे रुग्णांचे हाल, जुने कोबाल्ट युनिट बदलणे यावरही फडणवीस यांनी प्रकाश टाकला. बहुचर्चित मिहान प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, भूखंड अधिग्रहणातील अडथळे, जलद सुनावणीसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट, कन्व्हेंशन सेंटरची निर्मिती, तिरळे कुणबी समाजभवनासाठी पर्यायी जागा याचाही फडणवीस यांनी चर्चेदरम्यान उल्लेख केला. नागपूरच्या गृह निर्माण विभागाशी संबंधित नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडेही त्यांनी बैठकीत लक्ष वेधले. तसेच वाहतुकीचा वाढता भार लक्षात घेता अधिकाधिक उड्डाण पुलांच्या निर्मितीवर फडणवीस यांनी भर दिला आहे. रखडलेल्या रामझुला उड्डाण पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी पावले टाकण्याचा आग्रह त्यांनी लावून धरला.
शहरातील समस्यांबाबत आमदार फडणवीसांची आक्रमक भूमिका
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपूर विभागातील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विधानसभा तसेच विधान परिषद सदस्यांची आज मुंबईत बैठक घेतली.
First published on: 18-01-2013 at 04:45 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla fadanvis agrassive on the problems in the city