ठाणे जिल्ह्य़ातील आमदार निधीतून होणाऱ्या विकासकामांच्या फाइल्स सहा महिन्यांपूर्वी मंजूर होऊन ती कामे आता मार्गी लागणे आवश्यक होते. परंतु आर्थिक वर्ष संपत आल्याने जिल्हा प्रशासनाने आमदार निधीतील विकासकामांच्या फाइल्स आता तयार करून त्या मंजुरीसाठी ठेवल्या आहेत. त्यामुळे आमदारांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
२०११-१२ या आर्थिक वर्षांचा आमदार विकास निधी वर्षभरात शासनाकडून जिल्हा प्रशासनाकडे पाठविला जातो. हा निधी वेळेत आला की संबंधित आमदार आपल्या नगरसेवक, गावच्या कार्यकर्त्यांना विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देतो. आमदाराने जिल्हा प्रशासनाला पत्र दिले की पुढील सर्व कार्यवाही जिल्हा प्रशासन यंत्रणा पार पाडते. दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून आमदार निधीतील विकासकामांच्या फाइल्स गांभीर्याने पाहिल्या जात नाहीत, अशा तक्रारी लोकप्रतिनिधींकडून केल्या जात आहेत. आमदार निधीच्या कामांसाठी काही आमदारांकडून फारसा पाठपुरावा होताना दिसत नाही. जिल्हा प्रशासन कार्यकर्त्यांना जुमानत नाही. यामुळे निधी असूनही विकासकामे नाहक अडकून पडत आहेत, अशा तक्रारी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहेत.
जो आमदार निधी जिल्हा प्रशासनाने सहा महिन्यांपूर्वी मार्गी लावणे आवश्यक होते. त्या निधीमधील विकासकामांच्या फाइल्स आता आर्थिक वर्ष संपण्याच्या उंबरठय़ावर तयार करून जिल्हा प्रशासन आमदार निधीची हेळसांड आणि कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींचा अंत पाहात आहे, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. याबाबत जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या अधिकाऱ्याने सांगितले, आमदार निधी त्या आर्थिक वर्षांत वेळेवर येतो. आमदारांच्या शिफारसीप्रमाणे कामांच्या फाइल्स तयार केल्या जातात. निधी येणे आणि विकासकामांच्या फाइल्स मंजूर करणे या दोन स्वतंत्र प्रक्रिया आहेत. ठाणे जिल्हा नियोजन समितीने नुकत्याच आमदार निधीतील विकासकामांच्या फाइल्स मंजुरीसाठी तयार केल्या आहेत. त्या तात्काळ मंजूर होतील. कोणत्याही आमदार, कार्यकर्त्यांच्या निधीबाबत तक्रारी नसल्याचे जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.

Story img Loader