मागचे काही महिने तुरूंगात राहिल्याने आमदार शिवाजी कर्डिले यांचे संतुलन बिघडले आहे, याच वैफल्यातून ते उलट-सुलट वक्तव्ये करीत आहेत, असा आरोप माजी आमदार प्रसाद तनपुरे यांनी केला.
राहुरी तालुक्यातील काही पाणी योजनांचा वीजपुरवठा खंडित झाल्याचे निमित्त साधून कर्डिले यांनी तनपुरे यांच्यावर टीका केली. ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या नातेसंबंधांच्या अनुषंगाने त्यांनाही कर्डिले यांनी या टीकेत सहभागी करून घेतले. त्याला तनपुरे यांनी आक्रमक पध्दतीने उत्तर दिले.
तनपुरे म्हणाले, मुळात एकटा राहुरी तालुका किंवा मतदारसंघातील पाणी योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असे मुळीच नाही. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह आमदार विजय औटी, आमदार राम शिंदे यांच्या मतदारसंघातील पाणी योजनांवरही ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्य़ातील १ हजार २०० योजनांवर ही कारवाई करण्यात आली असून सुमारे पावणेतीन कोटी रूपयांच्या थकबाकी वसुलीसाठी महावितरण कंपनीनेच ही कारवाई केली आहे. त्याच्याशी ग्राम विकासमंत्री जयंत पाटील यांचा काहीही संबंध नाही. मात्र, या गोष्टीचे कुठलेही भान राहिले नसल्याने वैफल्यातूनच कर्डिले आरोप करीत आहेत.
पाणी योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे निर्माण झालेल्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठीच आपण प्रयत्नशील आहोत, असे सांगून तनपुरे म्हणाले, त्यासाठीच जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून याबाबतची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यात कोणताही राजकीय अभिनिवेष नाही. केवळ जयंत पाटीलच नव्हे तर या खात्याचा मंत्री कुणीही असता तरी याच सनदशीर मार्गाने हा प्रश्न सोडवण्याचा आपला प्रयत्न राहिला असता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla kardile fitness is in troubled says mla tanpure