पूर्व नागपूर
काँग्रेसचा गड समजला जाणाऱ्या पूर्व नागपुरात गत २००९च्या निवडणुकीत माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना धूळ चारणाऱ्या विद्यमान आमदार कृष्णा खोपडे यांनी यावेळी माजी आमदार दिवं. गोविंदराव वंजारी यांचे पुत्र काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांचा पराभव केला. काँग्रेसविरोधात असलेल्या वातावरणाचा आणि नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा कृष्णा खोपडेंना फायदा झाला. पूर्व नागपूर मतदारसंघात एकूण २० उमेदवार रिंगणात होते. त्यात शिवसेनेचे अजय दलाल व राष्ट्रवादी काँग्रेसचे दुनेश्वर पेठे यांना फक्त आठ हजारांच्या जवळपास मते मिळाली. तर बहुजन समाज पक्षाचे दिलीप रंगारी यांना १२ हजाराच्या वर मते मिळाली. विजयी उमेदवार कृष्णा खोपडे यांना ९९,१३६ मते मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार वंजारी यांनी ५०,५२२ मते घेतली. शिवसेनेच्या उमेदवार दलाल यांचा या मतदारसंघात फारसा प्रभाव दिसला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे पेठे यांनीही फारसे मते घेतली नाही. बसपचे उमेदवारानीही आपला प्रभाव पाडला नाही.
या मतदारसंघातून कृष्णा खोपडे यांचे गत निवडणुकीचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे सतीश चतुर्वेदी यांनी हारण्चाच्या भीतीमुळे दक्षिणमधून उमेदवारी मिळविली. तर पूर्व नागपुरातून नवखा उमेदवार अभिजित वंजारी यांना उमेदवारी देण्यास भाग पाडले. अभिजित वंजारी तेली समाजाचे असल्यामुळे त्यांना तेली समाजाचे कृष्णा खोपडे यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आल्याचे समजते. पण मतदार आता जात-पात पाहत नाही यांचा भान काँग्रेसला नाही. अभिजित वंजारींचा दक्षिण नागपुरातील कार्यकर्त्यांसोबत संपर्क होता. त्यामुळे त्यांना पूर्व नागपुरातील कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करण्यातच वेळ गेला. दुसऱ्या मतदारसंघातून आलेले वंजारी यांना मतदारांनी नाकारले. कृष्णा खोपडे २००९च्या निवडणुकीपूर्वी नगरसेवक होते. त्यावेळी त्यांना भाजपने उमेदवारी दिली तेव्हा माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचा खोपडे यांनी ३५ हजारांच्यावर मते घेऊन पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीच्या वेळी पूर्व नागपुरातून नितीन गडकरींना ६५ हजारांच्या जवळपास आघाडी मिळाली होती. यामुळे यावेळी आपण हमखास विजयी होऊ, असा विश्वास कृष्णा खोपडे यांना होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा