राष्ट्रवादी कांॅग्रेस पक्ष व पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठविले. त्याचा उपयोग सामान्य जनतेचे व शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण करू, असे आश्वासन ख्वाजा बेग यांनी आर्णी येथे नागरिक सत्कार सोहळ्यात सत्काराला उत्तर देतांना दिले.
अलीकडेच रविवारी दुपारी १२ वाजता त्यांचे आर्णीत आगमन होताच फटाक्यांच्या आतिशबाजी व ढोलताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. शिवनेरी चौकात त्यांची लाडुतुला करण्यात आली, तसेच मोठी रॅली काढून खुल्या जिपमध्ये त्यांना वाजतगाजत सभास्थळी आणण्यात आले. माहेर मंगल कार्यालयात आयोजित सत्कार सोहळ्याला जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ गाडबले, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील, सभापती सुभाष ठोकळ, वसंत घुईखेडकर व समिना शेख प्रमुख अतिथी म्हणून प्रामुख्याने उपस्थित होते. नागरिक सत्कार समिती नगर परिषद, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, लॉयन्स क्लब, चेंबर ऑफ कामर्स, पत्रकार संघ व प्रेस क्लब, निवृत्त कर्मचारी संघटना, कौमी तंजीम संघटना यांच्या वतीने शाल श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, मराठा सेवा संघाच्या वतीने मॉ.जिजाऊंचे छायाचित्र व सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
मी तुमचाच आमदार असून तुमची मान शरमेने खाली जाईल, असे काम कदापि करणार नाही. जातीपातीच्या पलिकडे जाऊन काम करण्याची गरज असून आईवडीलांची मनापासून सेवा करा. तुमच्या जीवनात यश निश्चित लाभेल, असेही ते म्हणाले. बाबुसिंग टेलर या पाभळ येथील जुन्या कार्यकर्त्यांने ख्वाजा बेग यांना व्यासपीठावर जाऊन जाकीट घातले तेव्हा त्यांना अश्रू आवरले नाही. माझ्याजवळ काहीच नसतांना ज्या बेडय़ांचा गरडा कायम राहील त्यांच्यासाठी मात्र ‘अब अच्छे दिन आयेंगे’ असे म्हणताच मात्र टाळ्यांचा एकच गजर झाला. नानाभाऊ गाडबले, प्रवीण देशमुख, वसंत घुईखेडकर, राजु बुटले, राजू गावंडे, जावेद पटेल, उध्दव भालेराव, संतोष अरसोड, मुबारक तंवर आदींनी यावेळी विचार मांडले. कार्यक्रमांचे संचालन हरीश कुडे यांनी, तर प्रस्ताविक सुनील राठोड यांनी केले. यासाठी रवी नालमवार, यासीन नागाणी, संदीप बुटले, हरीश कुडे, युनुस बेग, दीपक बुटले, फारुभाई शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Story img Loader